Sachin Waze arrest | सचिन वाझे यांची अटक पूर्णपणे बेकायदेशीर, वाझे यांच्या वकिलाचा दावा
पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयए कोर्टाने 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावली आहे.दरम्यान, सचिन वाझे यांच्या वकिलांनी ही अटक बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे.
मुंबई : पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक झाल्यानंतर एनआयए कोर्टात हजर केले असता त्यांना 25 तारखेपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. एकूण 14 दिवसांच्या कोठडीची एनआयएने मागणी केली होती. मात्र, एनआयए कोर्टानं केवळ दहा दिवस म्हणजेच, 25 तारखेपर्यंत सचिन वाझे यांनी एनआयए कोठडी सुनावली आहे. दरम्यान, ही अटक पूर्णपणे बेकायदेशीर असल्याचा दावा असे सचिन वाझे यांच्या वकिलांनी केला आहे.
आज कोर्टात काय घडले?
ही संपूर्ण बाब संशयाच्या आधारे असल्याने सचिन वाझे यांना झालेली अटक पूर्णपणे बेकायदेशीर आहे. कारण गुन्हेगारी कायदा असे म्हणत नाही की एजन्सीने संशयावरून कोणालाही अटक केली पाहिजे. असे कोणतेही प्राथमिक प्रकरण वाझे यांच्याविरूद्ध नाही. ही अटक घाईघाईने व मनमानी पद्धतीने केली असल्याचा दावा वाझे यांच्या वकिलाने केला आहे.
अटकेपूर्वी एनआयएने प्रोसीजर फॉलो केली नाही. कोणत्या आधारावर त्यांना अटक करण्यात आली, हेही वाजे यांना सांगण्यात आले नाही. वाझे यांना याबद्दल सांगणे हे एनआयएचे कर्तव्य आहे. वाझे यांना आपल्या कुटुंबातील सदस्यांशी बोलण्याची परवानगीही नव्हती आणि कायदेशीर मदत घेण्यासही त्यांना परवानगी नव्हती, अशी माहिती वाझे यांच्या वकिलाने दिली.
एनआयएचे वकील न्यायालयात म्हणाले?
एनआयएने न्यायालयात चौकशीची कागदपत्रे दाखविली आहेत, ज्यात साक्षीदारांची विधाने, सीडीआरशी संबंधित माहिती, सीसीटीव्ही आणि इतर कागदपत्रे अशी माहिती एनआयएच्या वकिलांनी दिली आहे.
उद्या या प्रकरणाशिवाय कोर्टात दोन गोष्टी घडू शकतात
सत्र न्यायालय
वाझे यांच्या वकिलांनी सुनावणीदरम्यान वाझे यांच्या अटकेस बेकायदेशीर ठरवले आहे, अशा प्रकरणात कोर्टाने एनआयएला उद्या माहिती देण्यास सांगितले आहे.
मुंबई उच्च न्यायालय
वाझे यांच्या वकिलांनी वाझे यांच्या अटकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे, हे प्रकरण उद्या बोर्डावर सुनावणीसाठी येऊ शकते.
सचिन वाझेंवर कोणती कलमान्वये कारवाई?
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर एका स्कॉर्पिओ गाडीत स्फोटकं आढळली होती. याप्रकरणी सचिन वाझे यांना अटक करण्यात आली आहे. NIA ने सचिन वाझे यांच्यावर आयपीसी कलम 286, 465, 473, 506(2), 120 B आणि स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब अंतर्गत कारवाई केली आहे. यामध्ये कलम 286- जाणीवपूर्वक किंवा अजाणतेपणाने स्फोटकं बाळगणे, इतरांच्या जीवाला धोका होईल असं वर्तन करणे, कलम 465 – खोट्या किंवा बनावट गोष्टी करणे, कलम 473 – दिशाभूल करण्यासाठी केल्या जाणाऱ्या बनावट कृती, कलम 506(2) – दहशत निर्माण करणं किंवा धमकी देणे, कलम 120 B – गुन्हेगारी स्वरुपाच्या षडयंत्रात सहभाग घेणे, स्फोटक पदार्थ कायदा 1908 कलम 4 अ, ब – स्फोटकं बाळगणे याचा समावेश आहे.