Iqbal Singh Chahal ED Inquiry : कोविड सेंटर घोटाळ्याचा आरोप, मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल ईडी चौकशीसाठी हजर राहणार
Iqbal Singh Chahal ED Inquiry : मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांची आज ईडीकडून चौकशी होणार आहे. कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी इक्बाल सिंह चहल सकाळी अकरा वाजल्यानंतर मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहतील.
Iqbal Singh Chahal ED Inquiry : मुंबई महापालिकेचे आयुक्त (Mumbai Municipal Corporation) इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांची आज अंमलबजावणी संचालनालयाकडून अर्थात ईडीकडून (ED) चौकशी होणार आहे. कोरोना काळातील कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी (Covid Centre Scam) इक्बाल सिंह चहल सकाळी अकरा वाजल्यानंतर मुंबईतील ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहतील. आपण ईडीला पूर्णपणे सहकार्य करु असं इक्बाल सिंह चहल यांनी आधीच सांगितलं.
चहल यांना ईडीकडून समन्स
ईडीने तीन दिवसांपूर्वी बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना समन्स पाठवलं होतं. त्यांना सोमवारी (16 जानेवारी) चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. कथित कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी त्यांना हे समन्स पाठवण्यात आलं होतं. कोरोनाच्या काळात कोरोना सेंटरमध्ये वैद्यकीय उपकरणांच्या खरेदीत घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. बेनामी कंपन्यांना कोविड सेंटरचे कंत्राट देऊन 100 कोटींचा घोटाळा केल्याचा दावा सोमय्या यांनी केला आहे. या संदर्भात ईडीने मुंबई महापालिका आयुक्तांना सोमवारी कागदपत्रांसह चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं होतं. त्यानुसार इक्बाल सिंह चहल आज चौकशीसाठी हजर राहतील.
या प्रकरणातील नेमके आरोप काय?
- कोरोना काळात मुंबईत जम्बो कोविड सेंटर सुरु करण्यासाठी विविध कंपन्यांना कॉन्ट्रॅक्ट देण्यात आले, यामध्ये लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस यांना कोणत्याही प्रकारचा अनुभव नसताना वैद्यकीय सेवा आणि उपकरणे पुरवण्याचे कंत्राट प्राप्त झालं.
- शिवाय कंत्राट प्राप्त करुन घेण्यासाठी या कंपनीने बनावट कागदपत्रे बीएमसीकडे सादर केल्याचा आरोप आहे
- ही कंपनी संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर आणि त्यांच्या भागीदाराच्या नावावर आहे. कंपनीची स्थापना जून 2020 मध्ये झाली. डॉक्टर हेमंत गुप्ता, सुजित पाटकर, संजय शहा, राजू साळुंखे हे भागीदार आहेत. तर बीएमसीला सादर केल्या पार्टनरशिप डीड खोटी आणि बनावट असलेल्या बाबी समोर आले आहेत, असा आरोप आहे
- या कंपनीकडे पुरेसा स्टाफ नाही तसेच एमडी डॉक्टर, ज्युनिअर, इटर्नशिप करणारे डॉक्टर नेमल्याचे आणि कंत्राटामधील अटी व शर्तीचा भंग केल्याचा निदर्शनास आलं
- संबंधित कंपनी नवीन असून तिला अनुभव नसतानाही कंत्राट दिली असेल निदर्शनास आलं त्यानंतर पुणे महानगर प्रदेश प्राधिकरणाने कंपनीला टर्मिनेट करुन 25 लाख रक्कम जप्त केली.
- त्यानंतर या कंपनीला कुठल्याही प्रकारचे कंत्राट न देण्याचे आदेश असताना सुद्धा मुंबई महापालिकेने या कंपनीला कंत्राट दिले अशी माहिती मिळाली
- त्यामुळे या सगळ्या कोविड सेंटर कंत्राटामध्ये 100 कोटी रुपये घोटाळा झाल्याचं आरोप करण्यात आले.
आयुक्तांकडून कंत्राटदारांना वाचवण्याचं काम : सोमय्या
महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर आणि कोरोनाचा प्रादुर्भाव मुंबईत वाढल्यानंतर कोरोना परिस्थिती हाताळण्यासाठी माजी बीएमसी आयुक्त प्रवीण परदेशी यांची बदली करुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 8 मे 2020 रोजी आयुक्तपदी इक्बाल सिंह चहल यांची नियुक्ती केली. आयुक्तपदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर कोरोनाच्या पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या लाटेत कोरोना नियंत्रणात ठेवण्यासाठी केलेल्या नियोजनाबद्दल, निर्णयाबद्दल आणि विशेष प्रयत्नाबद्दल आयुक्त चहल यांचं देश पातळीवर कौतुक झालं. परंतु कोरोना काळात साथ रोग प्रतिबंध कायदा आणि आपात्कालीन व्यवस्थापन कायद्या अंतर्गत कुठलीही निविदा प्रक्रिया न राबवता कोरोना कामाची कंत्राट देण्यात आली आणि याच कंत्राटांना आयुक्तांकडून मंजुरी देताना उद्धव ठाकरे आणि त्या वेळच्या सरकारमधील नेत्यांच्या निकटवर्तीयांना कंत्राट दिल्याचा आरोप किरीट सोमया यांनी केला आहे. या कंत्राटदारांना वाचवण्याचं काम बीएमसी आयुक्त करत असल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला आहे. आता ईडीने पाठवल्या समन्सनुसार आयुक्तांना ईडी कार्यालयात चौकशीसाठी हजर राहायचं आहे. या चौकशीतून नेमकं ईडीच्या हाती काय लागतं? या आरोपांमध्ये किती सत्यता आहे? आणि या चौकशीची दिशा आयुक्त व्हाया मातोश्रीपर्यंत जाते का? हे ईडीला मिळालेल्या माहिती नंतरच कळेल.