Aaditya Thackeray: भाजपचे मंत्री मंगलप्रभात लोढांवर आदित्य ठाकरेंचा गंभीर आरोप, कुर्ल्यातील जंगल तोडून स्विमिंग पूलचा घाट?
Aaditya Thackeray: 9 हजार झाडांचे ‘अर्बन फॉरेस्ट’ मंत्री मंगलप्रभात लोढा हे उद्ध्वस्त करून त्या जागी स्विमिंग पूल बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

मुंबई : कुर्ला येथील ITI परिसरात गेल्या वर्षी लागवड करण्यात आलेल्या 9000 झाडांचे ‘अर्बन फॉरेस्ट’ मंत्री मंगलप्रभात लोढा हे उद्ध्वस्त करून त्या जागी स्विमिंग पूल बांधण्याचा प्रयत्न करत आहेत, असा गंभीर आरोप युवासेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे. त्यांनी या प्रकाराला “निसर्गावरील हिंसा” असे म्हणत सोशल मीडियावरून तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
आदित्य ठाकरे यांनी आपल्या सोशल मिडीया (पूर्वीचे ट्विटर) X पोस्टमध्ये म्हटले आहे की, “ही संपूर्ण लागवड @HPCL (हिंदुस्तान पेट्रोलियम) या कंपनीच्या CSR निधीतून झाली आहे. हे अर्बन फॉरेस्ट शहरासाठी मोठी देणगी आहे आणि ते नष्ट करण्याचा प्रयत्न अतिशय निष्काळजीपणाचे आणि धोकादायक आहे.” आदित्य ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या पर्यावरणमंत्री भूपेंद्र यादव यांना या पोस्टमध्ये टॅग करत विनंती केली आहे की, “या प्रकारात त्वरित हस्तक्षेप करावा, कारण हे झाड तोडण्याचे काम आज रात्री सुरू होणार आहे, असा अंदाज आहे.” ठाकरे यांनी यास “शहराच्या भविष्यासाठी हानिकारक आणि पूर्णतः अमानवी कृत्य” असे संबोधले.
मुंबईसारख्या शहरात हरित पट्ट्यांचे प्रमाण आधीच अत्यल्प आहे. त्यात नवे लावलेले वृक्ष देखील स्वप्नातील प्रकल्पासाठी कापले जात असतील, तर ते निसर्गावरील अत्याचार मानला जाईल, अशी भूमिका ठाकरे यांनी मांडली आहे. “गेल्या वर्षी लावलेल्या नव्या अर्बन फॉरेस्टचा असा विनाश शहाणपणाचा नाही तर मूर्खपणाचा निर्णय आहे,” असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले. आज पावसाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्यातील कामकाजामध्ये विधिमंडळातही हा मुद्दा गाजण्याची शक्यता आहे.
The news is, Minister Lodha wants to hack an urban forest of 9000 trees, planted last year in the Kurla ITI.
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 7, 2025
CSR funds of @HPCL were used for this.
Apparently @MPLodha wants to make a swimming pool by cutting down this new urban forest!
Urging Union Environment Minister… https://t.co/CBr3bEaGRN
रात्रीचा डाव फसला
कुर्ला पश्चिममधील औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) परिसरात मियावकी पद्धतीने लावलेली 9 हजार झाडांची अर्बन फॉरेस्ट वाचली आहे. मध्यरात्री झाडांची बेकायदेशीर वृक्षतोड करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता, मात्र शिवसेना (ठाकरे गट) पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या सतर्कतेमुळे तो डाव उधळून लावण्यात आला. जेसीबी घेऊन आलेल्या दोन व्यक्तींना रंगेहाथ पकडून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही वृक्षतोड रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन करण्याचा डाव होता. जेसीबीने संरक्षक भिंत तोडून झाडे उखडण्यास सुरुवात केली जात असताना, ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी मनिष मोरजकर यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिक घटनास्थळी दाखल झाले आणि तातडीने हस्तक्षेप केला.
या प्रकरणावरून आता राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. युवासेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांच्यावर थेट आरोप केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, “ही वृक्षतोड एक ‘ड्रीम प्रोजेक्ट’ – स्विमिंग पूल – तयार करण्यासाठी केली जात होती. यासाठी केंद्र सरकारच्या HPCLच्या CSR निधीतून तयार करण्यात आलेले अर्बन फॉरेस्ट उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न होता.”
ठाकरे यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्याकडे या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. “हे निसर्गावरील अत्याचार असून मुंबईसारख्या शहरासाठी हरित पट्टे अत्यावश्यक आहेत,” असेही त्यांनी सांगितले.























