राज्यात कोरोना उपचारासाठी 30 विशेष रुग्णालये घोषीत; आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात कोरोना उपचारासाठी 30 विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली,
मुंबई : कोरोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभागाने राज्यातील 30 शासकीय रुग्णालये कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये म्हणून घोषीत केली आहेत. या रुग्णालयांत केवळ कोरोना रुग्णांवर उपचार केले जातील. त्यासाठी अधिसूचना काढण्यात आली असून 2305 खाटा कोरोनाबाधीतांच्या उपचारासाठी उपलब्ध झाल्या आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. कोरोना संक्रमितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्यातील आरोग्य विभागांच्या हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे आता राज्यात आता विशेष रुग्णालयांची घोषणा करण्यात आली आहे.
या अधिसूचनेमुळे या रुग्णालयांना संशयित आणि कोरोना निदान झालेल्या रुग्णांना केंद्र आणि राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार करणे बंधनकारक असणार आहे. राज्य शासनामार्फत कोरोना प्रतिबंधासाठी प्रभावी उपाययोजनांची अंमलबजावणी केली जात आहे. राज्यात चाचण्यांची सुविधा वाढवितानाच आवश्यकता भासल्यास रुग्णांवर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात विलगीकरण कक्ष करण्यात आले आहेत. मात्र, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोना उपचारासाठी विशेष रुग्णालये घोषीत करण्यात आली असून त्यासाठी आरोग्य संचालकांनी अधिसूचना काढली आहे, असेही आरोग्यमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
कोरोनाबाधित 85 टक्के लोकांमध्ये लक्षणं आढळली नाहीत; आरोग्य विभागाच्या अहवालातून धक्कादायक माहिती
जिल्हा आणि त्यातील अधिसूचीत रुग्णालयांची नावं आणि कंसात खाटांची संख्या ठाणे - जिल्हा रुग्णालय, टी.बी बिल्डींग (100), मीरा भाईंदर- पंडीत भीमसेन जोशी रुग्णालय (100), वाशी- सामान्य रुग्णालय (120), कल्याण डोबिवली म.न.पा.- शास्त्री नगर रुग्णालय (100), रायगड- पनवेल उपजिल्हा रुग्णालय (100), नाशिक- कुंभमेळा बिल्डींग व महानगरपालिका कठडा हॉस्पीटल अनुक्रमे (100) (70), अहमदनगर- जिल्हा रुग्णालय (100), नंदूरबार- डोळ्यांचा दवाखाना (50), धुळे- जिल्हा रुग्णालया शहारातील इमारत (50), पुणे- जिल्हा रुग्णालय, औंध (50), सातारा- सामान्य रुग्णालय (60), सिंधुदूर्ग- नविन इमारत एएमपी फंडेड (75), रत्नागिरी- सामान्य रुग्णालय व कळंबोळी उपजिल्हा रुग्णालय अनुक्रमे (100) (50), औरंगाबाद- जिल्हा रुग्णालय (100), हिंगोली- जिल्हा रुग्णालय (100), हिंगोली- कळमनुरी उपजिल्हा रुग्णालय (50), लातूर- उदगीर उपजिल्हा रुग्णालय (50), उस्मानाबाद- जिल्हा रुग्णालय, नविन इमारत (100), उमरगा उपजिल्हा रुग्णालय टीसीयू बिल्डींग (50) आणि तुळजापूर उपजिल्हा रुग्णालय नविन इमारत (50), नांदेड- जिल्हा रुग्णालय जुने (50) आणि मुखेड उपजिल्हा रुग्णालय (50). अमरावती- विशेषोपचार रुग्णालय नविन इमारत (100), वाशीम- जिल्हा रुग्णालय, डीईआयसी इमारत (50), बुलढाणा-स्त्री रुग्णालय नविन इमारत (100), वर्धा- सामान्य रुग्णालय (50), भंडारा- सामान्य रुग्णालय एएमसीएच विंग नविन इमारत (80) आणि गडचिरोली- जिल्हा रुग्णालय (100) यासर्व जिल्हा रुग्णालयातील सर्व खाटा मिळून 2305 खाटा कोरोना बाधीत रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहेत.
Lockdown | मुंबईत सोमय्या मैदानात भाजी खरेदीसाठी तुफान गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा