बीडमधील संतोष देशमुख हत्याप्रकरण, धनंजय मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; विरोधकांवर निशाणा
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे.
बीड : मराठवाड्यातील मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू बनलेल्या बीड जिल्ह्यातील केजमध्ये झालेल्या हत्येच्या घटनेनं राज्यभर खळबळ उडाली आहे. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून हत्या करण्यात आली. या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. मसाजोग ग्रामस्थांसह देशमुख कुटुंबीयांकडून तब्बल 12 तास अहमदपूर अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला हिंसक वळण देखील लागले. त्यामुळे, बीड (Beed) जिल्ह्यात कायद व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातच, बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन याबाबत चर्चा केल्याचंही सांगण्यात आला. आता, याप्रकरणी बीडचे माजी पालकमंत्री आणि आमदार धनंजय मुंडेंनीही (Dhananjay Munde) आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण हे फास्टट्रॅक कोर्टामध्ये चालवावं अशी मागणी धनंजय मुंडे यांनी केली आहे. संतोष देशमुख यांची हत्या दुर्दैवी आहे. विरोधक हे बीडचा बिहार झालाय असं बोलत आहेत, पण महाराष्ट्रामध्ये सगळीकडेच असे गुन्हे आणि घटना घडतात. त्यामुळे बीडला बदनाम करू नये, असं देखील धनंजय मुंडेंनी म्हटलं. धनंजय मुंडेंनी कोणावरही नाव न घेता विरोधक म्हणत टोला लगावला. दुसरीकडे भाजप नेत्या व आमदार पंकजा मुंडे यांनीही अशी वेळ जिल्ह्यात पुन्हा येऊ नये अशी प्रतिक्रिया दिली.
सगळ्या जाती धर्माचे लोक माझ्यावर भरभरून प्रेम करतात. केज तालुक्यातील माझ्या लहान भावांसोबत मी काम केलं होतं. मी कधी पक्ष बघितला नाही, मी माणुसकीचं नातं पाहिलं. कोणाच्यातरी आईचं लेकरू सकाळी निघाले आणि रात्री घरी आले नाही त्या आईच्या दुःखात मी सहभागी आहे. त्या घरातील प्रत्येक स्त्रीच्या, त्याच्या भावाच्या आई-वडिलांच्या दुःखात मी सहभागी आहे. आज अशी परिस्थिती पुन्हा बीड जिल्ह्यात येऊ नये, अशी भावनिक साद पंकजा मुंडे यांनी घातली आहे.
पोलिस उपनिरीक्षकांचं निलंबन
सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रस्ता रोको करत असलेल्या ग्रामस्थांची मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील आणि बीडचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी भेट घेतली. यावेळी ग्रामस्थांसोबत चर्चा करण्यात आली. आरोपींसोबत हितसंबंध असल्याचा आरोप केज पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजेश पाटील यांच्यावर करण्यात आला होता. बीडचे एस पी अविनाश बारगळ यांनी राजेश पाटील यांच्या तडकाफडकी निलंबन केलं आहे.. केज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रशांत महाजन यांचा अहवाल सुद्धा वरिष्ठांना पाठवणार असल्याचे सांगितले आहे.
एसआयटी स्थापन करा - सोळंके
माजलगावचे आमदार प्रकाश सोळंके यांनी संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली. काही राक्षसी प्रवृत्तीचे लोक जिल्ह्यात दहशत निर्माण करत आहेत. आणि सरपंच देशमुख यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक पोलिसांना तपास न देता यात एसआयटी स्थापन करा, अशी मागणी सोळंके यांनी केली आहे.
हेही वाचा
धाराशिवमध्ये बिबट्या आता थेट शेतात, हल्ल्यात शेतकरी जखमी, सीसीटीव्हीत कैद; वन विभाग अलर्ट