एक्स्प्लोर
1993 मुंबई साखळी स्फोट : दोषींच्या शिक्षेबाबत युक्तीवाद

मुंबई : 1993 मुंबई साखळी स्फोटातील दोषींच्या शिक्षेसंदर्भात आजपासून युक्तीवादाला सुरुवात होणार आहे. टाडा विशेष न्यायालयाने अबू सालेम, मुस्तफा डोसा, फिरोज खान, ताहिर मर्चंट, रियाज सिद्दीकी आणि करीमुल्ला शेख या सहा जणांना दोषी ठरवलं. तर एकाची निर्दोष सुटका करण्यात आली आहे.
या सर्वांवर हत्या, कट रचणे आणि टाडा कायद्याअंतर्गत गुन्हे सिद्ध झाले आहेत. त्यामुळे आज युक्तीवादाच्या पहिल्याच दिवशी काय घडामोडी घडत आहेत, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
या प्रकरणात टाडा कोर्टाने आधीच 100 आरोपींना दोषी ठरवलं आहे. या बॉम्बस्फोटांचा मुख्य सूत्रधार म्हणून याकूब मेमनला फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यानुसार त्याला फाशीही देण्यात आली.
खटल्यादरम्यान, मुंबई पोलिस आणि भारत सरकारने अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेमला पुर्तगालहून आणि मुस्तफा डोसाला दुबईहून प्रत्यार्पण करुन भारतात आणलं होतं. अबू सालेमला फाशी दिली जाणार नाही, याच अटीवर त्याचं पोर्तुगालने त्याला भारताकडे सुपुर्द केलं होतं.
कोणावर काय आरोप?
पाकिस्तानातून भारतात आलेला शस्त्रसाठी अबू सालेमने गुजरातहून मुंबईत आणला. यापैकीच शस्त्र त्याने अभिनेता संजय दत्तला दिले होते.
मुस्तफा डोसाने स्फोटांसाठी पाकिस्तानातून आलेले आरडीएक्स मुंबईला आणले. बॉम्बस्फोटासंदर्भात दुबईत झालेल्या पहिल्या बैठकीला तो उपस्थित होता.
आरडीएक्सने भरलेली मारुती व्हॅन गुजरातच्या भरुचमध्ये अबू सालेमकडे सोपवल्याचा आरोप रियाज सिद्दीकीवर आहे.
फिरोज खान आणि करीमुल्ला शेखवर स्फोटाचं सामान पोहोचवण्याचा आरोप आहे.
तर मोहम्मद ताहिर मर्चंटवर स्फोटात सहभागी आरोपींना प्रशिक्षणासाठी पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप आहे.
तसंच अब्दुल कय्यूमवरही संजय दत्तला शस्त्र दिल्याचा आरोप आहे.
12 मार्च 1993 साखळी बॉम्बस्फोट
12 मार्च 1993 साली झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 257 जण मृत्युमुखी पडले होते. तर 713 जण जखमी झाले होते. एकूण 27 कोटी रुपयांच्या मालमत्तेचं नुकसान झालं होतं. तर बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 3 हजार किलो आरडीएक्स पाकिस्तानातून आणलं होतं. त्यापैकी फक्त 10 टक्के आरडीएक्सचा वापर केला होता.
फोटो : 1993 मुंबई साखळी स्फोट : कोणावर काय आरोप?
संबंधित बातम्या
आणखी वाचा























