Mumbai Crime : प्रभादेवीत 18 वर्षीय तरुणाची आत्महत्या, पोलिसांनी आठवडाभराने गुन्हा दाखल करुन दोघांना बेड्या ठोकल्या
Mumbai Crime : मुंबईतील दादरच्या प्रभादेवी भागात एका 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या केली. विशेष बाब म्हणजे तरुणाने आत्महत्या केल्यानंतर तब्बल आठवडाभरानंतर पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे.
Mumbai Crime : मुंबईतील (Mumbai) दादरच्या प्रभादेवी (Prabhadevi) भागात एका 18 वर्षीय तरुणाने आत्महत्या (Suicide) केली. विशेष बाब म्हणजे तरुणाने आत्महत्या केल्यानंतर तब्बल आठवडाभरानंतर शुक्रवारी (14 एप्रिल) पोलिसांनी दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करुन त्यांना अटक केली आहे. पंकज जैस्वार असं आत्महत्या केलेल्या 18 वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याच्या आत्महत्येला आठवडाभराहून अधिक काळ लोटल्यानंतर एन एम जोशी मार्ग पोलिसांनी (N M Joshi Marg Police) दोन जणांविरुद्ध छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे प्रकरण?
पंकज जैस्वार हा तरुण प्रभादेवी भागात राहत होता. त्याने 6 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आयुष्य संपवलं होतं. त्याचे वडील रामराज जैस्वार यांच्या आरोपांनुसार, पंकजला सहा महिन्यांचा पगार मिळाला नव्हता. तो ज्या ठिकाणी काम करत होता तिथल्या मालकांकडे त्याने पगाराची मागणी केली होती. पगार मागितल्याने तिथले दोन मालक आणि आणखी एकाने त्याचं मुंडण केलं, त्याचे कपडे फाडले आणि परिसरातून त्याची धिंड काढली. या प्रकारामुळे पंकज नैराश्येच्या गर्तेत गेला. घरी परतल्यानंतर त्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.
दोन आरोपींना बेड्या
या प्रकरणी भारतीय दंड विधान कलम 306 (आत्महत्येस प्रवृत्त करणं), 323 (छळ), 504 (शांतता भंग करण्याच्या हेतूने हेतुपुरस्सर अपमान), 506 (गुन्हेगारी धमकी) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष चौरसिया आणि छोटेलाल प्रजापती अशी अटक केलेल्या दोघांची नावं आहे. आरोपींनी केलेल्या छळामुळे तरुणाला आपलं जीवन संपवण्यास भाग पाडलं, अशी माहिती एन एम जोशी मार्ग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संतोष कांबळे यांनी दिली.
पोलिसांनी काय माहिती दिली?
"छोटेलाल प्रजापती हा एका किराणा दुकानाचा मालक आहे जिथे पंकजने सुमारे सहा महिने काम केलं होतं. पंकजने त्याच्याकडे पगाराची मागणी केली होती. छोटेलाल प्रजापती, संतोष चौरसिया आणि अन्य एका व्यक्तीचा पंकजचा छळ करण्यात कथितपणे सहभाग होता ज्यामुळे पंकजने आत्महत्या केली," असं पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं.
पंकज जैस्वारचे कुटुंबीय मूळचे वाराणसीचे
दरम्यान, पंकजचे वडील रामराज जैस्वार यांच्या माहितीनुसार, ते 2022 च्या मध्यापासून प्रभादेवी इथल्या कामगार नगर इथे राहत आहेत. ते मूळचे वाराणसीचे आहेत.
हेही वाचा