Mumbai Local Train: ठाणे स्थानकातून नेरूळ, पनवेलकडे जाणारी लोकल सेवा ठप्प; अप आणि डाऊन मार्गावरील रेल्वे वाहतूक कोलमडली
Mumbai Local Trains: लोकलने प्रवास करणाऱ्या चकारमान्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी बातमी समोर आली आहे. ठाणे स्थानकातून नेरूळ, पनवेल कडे जाणाऱ्या अनेक लोकल (Mumbai Local Train) ठप्प पडल्या आहेत.

Mumbai Local Train मुंबई : मध्य रेल्वेमार्गावरील मुंब्रा स्थानकाजवळ सोमवारी सकाळी ठाण्याच्या दिशेने जात असलेल्या दोन लोकलचा अपघात (Raiway Accident in Mumbai) झाला. या दुर्दैवी घटनेने 13 प्रवासी चालत्या ट्रेनमधून खाली पडले होते. यापैकी चार प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर दोन प्रवासी गंभीररित्या जखमी आहेत. उर्वरित प्रवाशांवर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हे वृत्त ताजा असताना लोकलने प्रवास करणाऱ्या चकारमान्यांच्या चिंतेत आणखी भर घालणारी बातमी समोर आली आहे. नेरूळ स्थानकात (Nerul station) सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याची माहिती समोर आली आहे. परिणामी ठाणे स्थानकातून नेरूळ, पनवेल कडे जाणाऱ्या अनेक लोकल (Mumbai Local Train) ठप्प पडल्या आहेत.
ठाण्यातून केवळ वाशीसाठी लोकल सुरू
पुढे आलेल्या माहितीनुसार, ठाणे स्थानकातून नेरूळ, पनवेल कडे जाणारी रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली असून अप आणि डाऊन या दोन्ही मार्गावरील रेल्वे लोकल वाहतूक सेवा कोलमडली आहे. तर ठाण्यातून केवळ वाशीसाठी लोकल सुरू असून हार्बर मार्गिका ठप्प झाली असल्याचे सांगितलं जातंय. नेरूळ येथील स्थानकात सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने वाशी ते पनवेल अप आणि डाऊन मार्गिका ठप्प झाली आहे. तर दुसरीकडे केवळ सीएसएमटी(CSMT) ते वाशी लोकल सुरू असणार आहे. मात्र ट्रान्स हार्बर रेल्वे वाहतूक देखील ठप्प असून केवळ ठाणे ते वाशी लोकल सेवा सुरू आहे. दरम्यान, पिक अवरमध्ये बिघाड झाल्याने प्रवाश्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागतो आहे.
रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अजूनही भावनाशून्य कसे?
दरम्यान, मुंबईत झालेल्या लोकल अपघातात 4 प्रवाश्यांना जीव द्यावा लागला, अनेक जण गंभीर जखमी झाले. पण रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांना त्याचे काही सोयरसुतक नाही का? असा प्रश्न आता साऱ्यांना पडतो आहे. कारण काल सकाळी अपघात होऊन देखील अजून पर्यंत रेल्वे मंत्र्यांकडून मृत प्रवाशांसाठी साधी श्रद्धांजली देखील वाहण्यात आली नाही. अपघाताची माहिती, त्यावर केलेल्या उपाययोजना, रेल्वेकडून करण्यात आलेले प्रयत्न याबद्दल तर माहिती दिलीच नाही, सोबतच मृतांना, जखमींना काही मदत देखील रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही मदत तरी मिळणार का? याची देखील माहिती नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टींसाठी सोशल मीडियावर नेहमी सक्रियअसलेले रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव अजूनही भावनाशून्य कसे? असेही आता बोललं जातंय.
रेल्वे मंत्री साधी श्रद्धांजली देखील वाहू शकत नाही का?
सर्वाधिक उत्पन्न मुंबईकर प्रवासी रेल्वेला देतात, त्याविरोधात सर्वात कमी सुविधा मुंबईकर प्रवाश्यांना मिळतात, हा दूजाभाव असतानाच रेल्वे मंत्री साधी श्रद्धांजली देखील वाहू शकत नाही का? सवाल उपस्थित केला जातोय. एक दिवस आधीच, चिनाब ब्रीजसाठी अमूलने दिलेल्या जाहिरातीचा फोटो काढून रेल्वे मंत्री यांनी X वर पोस्ट केला आणि धन्यवाद म्हटले आहे. मग इतके वर्ष अतिशय वाईट परिस्थित प्रवास करून देखील, अपघात होऊन देखील शांत पणे प्रवास करणाऱ्या मुंबईकर प्रवाश्यांना रेल्वे मंत्री विसरले का?असेही आता बोललं जातंय.
इतर महत्वाच्या बातम्या
























