Krupal Tumane : शेतकऱ्यांना एकरी 50 हजार रुपये भरपाई देण्याची मागणी, खासदार तुमानेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
कृपाल तुमाने यांनी संसदेतही शेतकऱ्यांच्या मदतीचा मुद्दा उचलणार असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असल्याची कबुली खासदार तुमाने यांना दिली.
नागपूर : नागपूर जिल्ह्यात अतिवृष्टी, संततधार पाऊस व पुरामुळे शेतकऱ्यांना अभूतपूर्व नुकसान झाल्याची माहिती दिली. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील शेकऱ्यांना या संकटातून सावरण्यासाठी व रबी हंगामाची तयारी करण्यासाठी तातडीने एकरी 50 हजार रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी रामटेक लोकसभेचे खासदार कृपाल तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दिल्ली येथे भेट घेतली. यावेळी तुमाने यांनी संसदेत नुकसानीचा मुद्दा लावणार असून केंद्र सरकारकडूनही नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. तुमाने यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून संततधार पावसामुळे नुकसान झाल्याचे कळविले होते. त्यानंतर दिल्लीत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली. सर्व 13 तालुक्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांनी दिली.
सरासरीच्या 300 मीमी जादा पाऊस
मुख्यमंत्री शिंदे यांना माहिती देताना तुमाने म्हणाले, पावसाळ्याच्या जून ते आक्टोंबर दरम्यान जिल्ह्यात सरासरी 834 मी.मी. पाऊस पडतो, मात्र पावसाळ्याचे पहिले दोन महिने समाप्त होण्यापूर्वी जिल्ह्यात 716 मी.मी. पाऊस झाला आहे. यावरून पावसाचा अंदाज घेता येईल. जुलै महिन्यापर्यंत साधारणत: 400 मी.मी. पाऊस पडतो, तर आतापर्यंतचा उच्चांकी पाऊस 550 मी.मी. आहे. यंदा मात्र पावसाने कहर केला असून सरासरीपेक्षा 300 मी.मी. जादा पाऊस झाल्याची माहिती त्यांनी दिली.
बळीराजाला संकटातून वाचवा
नागपूर जिल्ह्यात सरासरी 4,67,300 हेक्टरमध्ये लागवड केली जाते, मात्र संततधार पावसामुळे खरीपाची लागवड 4,07,450 हेक्टरवर स्थिरावली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक 2.20 लाख हेक्टरमध्ये कापसाचे पीक घेतले जाते. कपाशीचे संपूर्ण नुकसान झाले आहे. सोयाबीन व तूर पिकेही पूर्णत: बुडाली आहे. 25 हजार हेक्टर क्षेत्रातील संत्रा मौसंबी फळबागांना मृग बहर येणार नाही. भाजीपाला व इतर पीके देखील खराब झाले आहे. सुमारे 90 % खरीप बुडाला आहे. नुकसानीमुळे शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढला आहे. बळीराजाला या संकटातून वाचविण्याची जबाबदारी सरकारने घ्यावी असा आग्रह तुमाने यांनी धरला.
शेतकऱ्यांना मदत करणार - मुख्यमंत्री शिंदे
अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे केवळ शेतांचेच नुकसान झाले नाही, तर अनेकांची घरेही उद्ध्वस्त झाली आहेत, त्यांना घरकुलासाठी मदत करावी. नदी, नाल्यांवरील रस्ते व पूल वाहून गेले, पावसामुळे सडकेची अवस्था बिकट झाली आहे, कालवे फुटले त्यामुळे अनेक ठिकाणी तलाव साचले आहे, त्यांच्या दुरुस्तीसाठी तात्काळ निधी द्यावा. जिल्ह्यात यंदा झालेले नुकसान अभूतपूर्व आहे, यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास कोणतिही कात्री लावू नये सोबतच नुकसान ग्रस्तांना तात्काळ मदत द्यावी, अशी मागणी खासदार तुमाने यांनी मुख्यमंत्री शिंदे यांना यावेळी केली. संसदेतही हा मुद्दा उचलणार असल्याची ग्वाही दिली. मुख्यमंत्री शिंदे यांनी तातडीने शेतकऱ्यांना मदत जाहीर करणार असल्याची कबुली खासदार तुमाने यांना दिली.