Manipur President Rule: मणिपूरमधील राष्ट्रपती राजवटीवर पहाटे चार वाजता राज्यसभेची मोहोर; गृहमंत्री अमित शाहांनी स्वीकारले 260 मृत्यूचे सत्य!
Manipur President Rule: मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची पुष्टी करणारा वैधानिक ठराव शुक्रवारी (4 एप्रिल 2025) पहाटे 4 वाजता उच्च सभागृहाने आवाजी मतदानाने मंजूर केलाय.

Manipur President Rule: मणिपुरात राष्ट्रपती राजवट (President rule) लागू करण्याला अनुमोदन देण्याचा प्रस्ताव राज्यसभेत(Rajya Sabha) मंजूर करण्यात आला. संसदेने शुक्रवारी पहाटे मणिपूरमध्ये राष्ट्रपती राजवटीची पुष्टी करणारा वैधानिक ठराव मंजूर केलाय. हिंसाचारग्रस्त मणिपूरमध्ये 13 फेब्रुवारी रोजी राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी राज्यसभेत दोन महिन्यांच्या आत राष्ट्रपती राजवटीची पुष्टी करण्याचा वैधानिक ठराव चर्चेसाठी आणि पास करण्यासाठी सादर केला.
दरम्यान, शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास सभागृहाने आवाजी मतदानाने हा ठराव मंजूर केला. लोकसभेने तो ठराव आधीच मंजूर केला होता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सभागृहात सांगितले की मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला होता त्यानंतर राज्यपालांनी आमदारांशी चर्चा केली आणि बहुसंख्य सदस्यांनी सांगितले की ते सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नाहीत. गृहमंत्री अमित शाह म्हणाले की, यानंतर मंत्रिमंडळाने राष्ट्रपती राजवटीची शिफारस केली जी राष्ट्रपती महोदयांनी मान्य केली.
मला मान्य आहे की 260 लोक मरण पावले - अमित शाह
पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार मी दोन महिन्यांत सभागृहाच्या मंजुरीसाठी यासंदर्भात वैधानिक ठराव आणला आहे. शाह पुढे म्हणाले की, सरकारची पहिली चिंता मणिपूरमध्ये शांतता प्रस्थापित करणे आहे आणि गेल्या चार महिन्यांत एकही मृत्यू झाला नाही आणि फक्त दोन जण जखमी झाले आहेत.
अमित शाहांनी सांगितले वातावरण बिघडण्याचे कारण
गृहमंत्र्यांनी मणिपूरमधील परिस्थिती बिघडण्यामागे न्यायालयाच्या निर्णयाचे मुख्य कारण नमूद केले ज्यामध्ये एका जातीला आरक्षण देण्यात आले. न्यायालयाच्या या निर्णयाला दुसऱ्याच दिवशी सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिल्याचे ते म्हणाले. मणिपूरमध्ये लवकरच शांतता असावी, पुनर्वसन व्हावे आणि लोकांच्या जखमा भरल्या जाव्यात, अशी सरकारची इच्छा असल्याचे ते म्हणाले. मणिपूरच्या मुद्द्यावर विरोधी पक्षांनी राजकारण करू नये, असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले.
जिथे अडचण असते तिथे पंतप्रधान शाहांना पाठवतात- मल्लिकार्जून खरगे
दरम्यान, मणिपूरच्या मुद्यावरून काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय. तिथे लोकांनी दोन्ही खासदार काँग्रेसचे निवडून दिले. मणिपूरला राहुल गांधींनी भेट दिली. मात्र नरेंद्र मोदी परदेशात गेले, पण मणिपूरला गेले नाहीत. जिथे अडचण असते तिथे पंतप्रधान मोदी शाहांना पाठवतात, किरेन रिजिजूला पाठवतात. मोदींनी निवडणूक प्रचारात सहभाग घेतला पण मणिपूरला गेले नाहीत. तिथे हिंसा झाली, महिलांवर अत्याचार झाले. त्याची चौकशी करा, ही आमची मागणी आहे. सभागृहात श्वेतपत्रिका सादर करा, अशी मागणी करत काँग्रेस नेते मल्लिकार्जून खरगे यांनी सरकार आणि पंतप्रधान मोदींवर जोरदार टीका केली आहे.
पंतप्रधान मोदींना मणिपूरसाठी अद्याप वेळ मिळू शकला नाही- मल्लिकार्जुन खरगे
तत्पूर्वी, विधेयकावरील चर्चेत भाग घेताना विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे म्हणाले की, मणिपूरमध्ये एवढा हिंसाचार होऊनही पंतप्रधान नरेंद्र मोदींना अद्याप त्या राज्यात जाण्याची संधी मिळालेली नाही. पुढे ते म्हणाले की, सत्ताधारी पक्षावर प्रचंड दबाव असताना मुख्यमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला. ते म्हणाले की, मणिपूरमध्ये भाजपचे 'डबल इंजिन सरकार' सपशेल अपयशी ठरले आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओब्रायन म्हणाले की, मणिपूरमध्ये 22 महिन्यांपासून परिस्थिती बिकट आहे आणि पंतप्रधानांनी एकदाही तेथे भेट दिली नाही. सत्ताधारी पक्ष मणिपूरबाबत गर्विष्ठ वृत्ती बाळगत असल्याचा आरोप त्यांनी केला.
इतर महत्वाच्या बातम्या
























