University Exam | 'त्यांना विद्यार्थांच्या जीवाची काळजी नाही का?'; युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांचा केंद्र सरकारला सवाल
यूजीसीच्या परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई : यूजीसीच्या (विद्यापीठ अनुदान आयोग) परीक्षा व शैक्षणिक कॅलेंडरच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यूजीसीने घेतलेल्या या निर्णयावर अनेकांनी विरोधा दर्शवला तर अनेकांनी यूजीसीच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्वीट करत यूजीसीने घेतलेल्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. 'देश जगभरातील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांना विद्यार्थांच्या जीवाची अजिबात काळजी नाही का?', असा प्रश्न वरुण सरदेसाई यांनी उपस्थित केला आहे.
राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने एकीकडे विद्यापीठांच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्यानंतर यावर युजीसी काय नेमका निर्णय देते याकडे सर्व विद्यार्थ्यांचं लक्ष लागलं होतं. अशातच यूजीसीने देशातील विद्यापीठ आणि उच्च शिक्षण संस्थांना सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. यूजीसीच्या या निर्णयानंतर युवासेना सचिव वरुण सरदेसाई यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'केंद्र सरकारने अंतिम वर्षाची परीक्षा 'सक्तीने' घेण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक!! सध्या भारत जगभरातील सर्वाधिक रुग्ण असणाऱ्या देशांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. भारतात 7 लाख कोरोना बाधित आढळून आले आहेत. त्यांना विद्यार्थांच्या जीवाची अजिबात काळजी नाही का?' असा प्रश्न युवसेना सचिव वरुण सरदेसाई यांनी उपस्थित करत केंद्र सरकारवर टीका केली आहे.
यूजीसीने अंतिम वर्षाच्या परिक्षांबाबत घेतलेल्या निर्णयाचं भाजप नेते आशिष शेलार यांनी मात्र समर्थन केलं आहे. आशिष शेलार यांनी आपल्या ट्विटर हॅन्डलवरुन यासंदर्भात तीन ट्वीट केले आहेत. आशिष शेला म्हणाले की, 'देशातील विद्यार्थ्यांना नोकरी, उच्च शिक्षणात समान संधी मिळावी म्हणून विद्यापीठ अनुदान आयोगाने 'एकसूत्री' निर्णय घेतला. शैक्षणिक आरोग्या सोबत विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी करुन सप्टेंबर पर्यंत कालावधी वाढवून दिला. आता नोकरीच्या संधीत महाराष्ट्राचे विद्यार्थी मागे पडू नये.' पुढिल ट्वीटमध्ये ते म्हणाले की, 'मा.मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे गाईडलाईनची मागणी पत्राने केली होती. आता राज्यातील विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी मुख्यमंत्र्यांनी घ्यावी. राज्य सरकारच्या निर्णयात कुलपती, कुलगुरूंना अनभिज्ञ ठेवून युजीसीच्या गाईडलाईन प्रमाणे तो निर्णय नव्हता हे स्पष्ट झाले!'
यूजीसीने घेतलेल्या निर्णयासंदर्भातील आपल्या शेवटच्या ट्वीटमध्ये आशिष शेलार यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, 'राज्य सरकार एटीकेटीच्या विद्यार्थ्यांना नापास करणार होते? ते सुदैवाने आता बचावले. आधी घोषणा, मग निर्णय, मग गृहपाठ यामुळे जो विद्यार्थ्यांना गेले तीन महिने मनस्ताप झाला. विद्यार्थी भयभीत आहेत त्यांना संभ्रमातून बाहेर काढा... आता तरी सु-सूत्रे योग्य नियोजन करा!!' असं म्हणत सल्लाही ठाकरे सरकारला आशिष शेलार यांनी दिला आहे.
दरम्यान, यूजीसीच्या सुधारित मार्गदर्शक सूचनांनुसार अंतिम वर्षातील अंतिम सत्राच्या विद्यापीठ आणि उच्च शैक्षणिक संस्थांच्या परीक्षा या सप्टेंबरमध्ये घ्यायच्या आहेत. या परीक्षा ऑफलाईन (पेपर/ पेन पद्धतीने ), ऑनलाईन पद्धतीने किंवा संमिश्र पद्धतीने घेतल्या जाऊ शकणार आहेत. काही कारणास्तव सप्टेंबरमधील परीक्षांना विद्यार्थ्यांना उपस्थित राहता आले नाही तर विद्यापीठ किंवा उच्च शैक्षणिक संस्थेकडून योग्य वेळेनुसार पुन्हा एकदा त्या विद्यार्थ्याला परीक्षेची संधी देण्यात यावी. जेणेकरून त्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही. मात्र ही संधी केवळ 2019- 20 मधील सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी एकदाच उपलब्ध असणार आहे. इतर वर्षाच्या परीक्षांसाठी यूजीसीच्या जुन्या मार्गदर्शक सूचनाप्रमाणेच कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आपले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
युजीसीच्या सुधारित गाईडलाइन्सनुसार विद्यापीठ अंतिम वर्षाच्या परीक्षा सप्टेंबरमध्ये होणार