(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आत्महत्या करण्यापूर्वी सिंघम लेडी दीपाली चव्हाण यांनी आपल्या तक्रार अर्जात काय लिहलं होतं?
माझ्या आत्महत्येला सर्वस्वी उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार (Vinod Shivkumar) हेच जबाबदार असतील असा उल्लेख वन परिक्षेत्रपाल दीपाली चव्हाण ( Deepali Chavan ) यांनी आत्महत्येपूर्वी लिहलेल्या तक्रार अर्जात केला होता.
अमरावती : माझ्या आत्महत्येला सर्वस्वी जबाबदार हे गुगामल वन्यजीव विभागाचे उपवनसंरक्षक विनोद शिवकुमार हेच असतील, त्यांच्यावर कारवाई करा. माझ्यासोबत जे झाले ते इतरांसोबत होऊ नये असे आत्महत्या केलेल्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्त्येपूर्वी केलेल्या तक्रार अर्जात लिहलं आहे.
रेल्वे गाडीत बसून डिंक तस्कर पळून गेल्यावर दुचाकीद्वारे मध्यप्रदेशपर्यंत पाठलाग करत आरोपींना सळो की पळो करुन सोडणार्या आणि लेडी सिंघम म्हणून ओळखल्या जाणार्या वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण (वय 28 वर्ष) यांनी हरिसाल येथील शासकीय निवासस्थानी स्वत:वर गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना गुरूवार रात्री आठ वाजताच्या दरम्यान घडली.
उपवनसंराक्षक विनोद शिवकुमार यांनी दिलेल्या त्रासामुळे आत्महत्या करत असल्याचे दिपाली चव्हाण यांनी आत्महत्या करण्यापुर्वी केलेल्या तक्रारी अर्जात म्हंटले आहे. हा तक्रारी अर्ज रेड्डी, अपर प्र.भु.व. संरक्षक क्षेत्र संचालक मेळघाट व्याघ्र प्रकल्प अमरावती यांच्या नावे केला आहे. दीपाली चव्हाण यांनी लिहलेल्या चार पानांच्या या पत्रात त्यांनी आपण का आत्महत्या करत आहोत याचा खुलासा केला आहे.
उपवनसंरक्षक शिवकुमार यांनी आपल्यावर केवळ ऐकीव माहितीवर नोटीस काढायला सुरूवात केली असल्याचं दीपाली चव्हाण यांनी या पत्रात सांगितलं आहे. शिवकुमार हे वारंवार आपल्याला निंलंबित करण्याची आणि चार्जशीट दाखल करण्याची धमकी द्यायचे. त्यांनी अनेकवेळा आपल्याला सर्वांसमोर शिव्या दिल्या असल्याचंही दीपाली चव्हाण यांनी सांगितलंय.
शिवकुमार यांनी आपल्याला नेहमी नियमबाह्य कामं करायला भाग पाडल्याचं सांगत दीपाली चव्हाण म्हणतात की ते आपल्याला कमीपणा दाखण्याचे कारण शोधत असायचे. दीपाली चव्हाण म्हणतात, 17 मार्च 2020 रोजी मांगिया येथील अतिक्रमणाबाबत शिवकुमारांनी दुपारी दोन वाजता फोन केला. तू स्वत: जाऊन त्या आरोपीला ताब्यात घे आणि अतिक्रमण हटव असा आदेश दिला. तसे करताना गाव वाल्यांनी आपल्याला कोंडून ठेवले आणि शिवीगाळ केली. ही माहिती शिवकुमारांना दिल्यानंतर त्यांनी उलट आपल्यालाच खोटं बोलत असल्याचं, नाटक करत असल्याचं सांगितलं आणि आपण जिल्हा पोलीस प्रमुखांना सांगून तूझ्यावर अॅस्ट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करु आणि चार महिने जेलमध्ये पाठवू अशी धमकी दिली.
या प्रकरणाचे रेकॉर्डिंग त्यांनी खासदार नवनीत राणा यांना ऐकवल्याचं सांगितलं. अॅस्ट्रॉसिटीमुळे बेल न मिळाल्याने आपल्याला सुट्टीवर जावं लागलं आणि नंतर शिवकुमार यांनी कामावर रुजू करून घेण्यास नकार दिला. तसेच आपले वेतनही रोखण्यात आल्याचा आरोप केला.
शिवकुमार यांनी आपल्याला सातत्याने मानसिक त्रास दिला आणि आपल्या आत्महत्येला तेच जबाबदार असतील असंही दीपाली चव्हाण यांनी आपल्या तक्रार अर्जात लिहलंय.
संबंधित बातमी :