(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Weekly Recap : कुठे आग, तर कुठे संप; तर काही राजकीय घडामोडी; कसा होता सरता आठवडा?
Weekly Recap : अनेक छोट्या-मोठ्या घडामोडींनी सरता आठवडा गाजला. जाणून घेऊया, नववर्षातील पहिला आठवडा नेमका होता कसा? यासंदर्भात सविस्तर...
Weekly Recap : जुनं वर्ष सरलं, नवं वर्ष सुरु झालं.... आज नव्या वर्षातील पहिला आठवडा संपला. या आठवड्यात अनेक महत्त्वाच्या गोष्टी घडल्या. काही दिलासा देणाऱ्या तर काही अंगावर शहारे आणणाऱ्या. काही थरकाप उडवणाऱ्या तर काही आनंद देणाऱ्या, आठवडाभरातील अशाच काही चांगल्या, वाईट आणि महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आम्ही तुमच्यासाठी सविस्तपणे घेऊन आलोय.
नववर्षाचं सर्वांनी उत्साहात स्वागत केलं. पण नव्या वर्षाची सुरुवातच एका धक्कादायक घटनेनं घडली. ती घटना म्हणजे, दिल्लीतील कंझावाला प्रकरण. या प्रकरणानं संपूर्ण देश हादरला. त्यानंतर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी राज्यात दोन मोठ्या आगीच्या घटना घडल्या. नाशकातील जिंदाल कंपनीत झालेल्या स्फोटानं संपूर्ण शहरच हादरलं, तर त्याचदिवशी बार्शीतील फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग लागली. याव्यतिरिक्त या आठवड्यात चर्चेत राहिलं ते अजित पवारांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत केलेलं वक्तव्य. त्यावरुन राजकीय वर्तुळात अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
नववर्षाच्या पहिल्याच आठवड्या राज्यात दोन मोठे संप पुकारण्यात आले. एक मार्डचा संप, तर दुसरा महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप. आपल्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी एकीकडे डॉक्टरांनी, तर दुसरीकडे वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संपानं नववर्षाचा पहिला आठवडा गाजला. नववर्षाच्या पहिल्या आठवड्या काही दिग्गजांनी जगाचा निरोप घेतला. शेकापचे ज्येष्ठ नेते केशवराव धोंडगे आणि भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन झालं.
यांसारख्या अनेक छोट्या-मोठ्या घडामोडींनी सरता आठवडा गाजला. जाणून घेऊया, नववर्षातील पहिला आठवडा नेमका होता कसा? यासंदर्भात सविस्तर...
दिल्लीतील कंझावाला प्रकरण, ज्यानं फक्त राजधानीच नाही, तर संपूर्ण देश हादरला (1 जानेवारी 2023)
मद्यधुंद अवस्थेत असलेले पाच आरोपी कारमधून नवीन वर्ष साजरे करण्यासाठी जात होते. त्यांच्या कारखाली येऊन एका तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेनंतर दिल्लीत खळबळ पसरली. ही घटना सुलतानपुरी येथील आहे. कार आणि स्कूटीची धडक झाल्यानंतर तरुणी गाडीखाली आली आणि कारने तिला कंझावालापर्यंत फरफटत नेले. हा अपघात एवढा भीषण होता की यावेळी मुलीचे सर्व कपडे फाटले. पोलिसांना तिचा मृतदेह विवस्त्र अवस्थेत सापडला. दारूच्या नशेत असल्यामुळे त्यांना एवढा मोठा अपघात झाल्याचेही कळले नाही, असे आरोपींनी सांगितले आहे.
नाशकातील जिंदाल कंपनीत मोठा स्फोट (1 जानेवारी 2023)
नाशकातील इगतपुरीतल्या मुंढेगावा जवळच्या जेपीएफएल अर्थात जिंदाल कंपनीच्या एका युनिटमध्ये एक मोठा स्फोट झाला. ज्या स्फोटानं शेजारपाजारच्या इंडस्ट्रीज हादरल्या आणि अचानक स्फोटापाठोपाठ आगडोंब उसळला. तब्बल दोन दिवस आग धुमसत होती. नाशिकच्या (Nashik) इगतपुरी (Igatpuri) तालुक्यातील मुंढेगाव शिवारातील जिंदाल कंपनीत गॅस गळतीनंतर भीषण स्फोटाची घटना घडली. यानंतर भीषण आग लागून दोन कामगारांचा मृत्यू तर 17 जण जखमी झाले. आगीनंतर अनेक गोष्टी समोर आल्या.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ कामगार मंत्री सुरेश खाडे यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती आणि अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या. या दुर्घटनेतल्या जखमी आणि मृतांचा आकडा आणखी वाढला नसल्याची माहिती त्यांनी माध्यमांना दिली. या दुर्घटनेत आणखी काही जण बेपत्ता आहेत का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न अजूनही सुरु आहे. त्यासाठी घटना घडली त्यावेळी किती कामगार कामावर हजर होते आणि कोणी बेपत्ता आहे का? याची माहिती सादर करण्याचे आदेश कंपनी व्यवस्थापनाला देण्यात आले आहेत.
बार्शीत फटाक्याच्या कारखान्यात भीषण आग (1 जानेवारी 2023)
नववर्षाचं स्वागत अग्नितांडवानं झालं. नाशिकच्या जिंदाल पॉली फिल्म कंपनीतील स्फोटापाठोपाठ सोलापूर जिल्ह्यातील बार्शीमध्ये पांगरी गावाजवळ फटाका फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्यानंतर आग लागली होती. बार्शी तालुक्यातील पांगरी गावाजवळ ही घटना घडली. फॅक्टरीमध्ये फटाके बनवण्याचं काम सुरू असतानाच ही घटना घडली.
स्थानिक ग्रामस्थांनी आणि अग्निशमन दलानं आग नियंत्रणात आणली. फॅक्टरीमधील सर्व कर्मचाऱ्यांना उपचारासाठी बार्शी येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. स्फोटादरम्यान तीन महिलांचा जाग्यावरच मृत्यू झाला होता. या आगीत तीन महिला गंभीर जखमी झाल्या होत्या. तर आगीत होरपळल्यामुळे तीनजण गंभीर जखमी झाले होते.
शेकाप नेते केशवराव धोंडगे यांचं निधन (1 जानेवारी 2023)
महाराष्ट्राची मुलुख मैदानी तोफ थंडावली. क्रांतिवीर जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई केशवराव धोंडगे यांची प्राणज्योत मालवली. नांदेड जिल्ह्यातील कंधार येथील मूळ रहिवाशी जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी, माजी खासदार, माजी आमदार आणि शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी या संस्थेचे अध्यक्ष भाई केशवराव धोंडगे यांचं वयाच्या 103 व्या वर्षी वृद्धापकाळानं निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून केशवराव यांच्यावर प्रकृती अस्वस्थामुळे औरंगाबाद येथील MGM रुग्णालयात उपचार सुरू होते. दरम्यान, 1 जानेवारी 2023 रोजी दुपारी 1 वाजून 20 मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.
अजित पवारांचं छत्रपती महाराजांसंदर्भातील वक्तव्य
विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी छत्रपती संभाजी महाराज यांबद्दल केलेल्या वक्तव्याचे पडसाद महाराष्ट्रभर पडल्याचे पाहयला मिळालं. अजित पवारांच्या वक्तव्याविरोधात भाजपचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले होते. ठिकठिकाणी अजित पवारांच्या विरोधीत निषेध आंदोलन करण्यात आलं. नाशिकमध्ये भाजप समर्थकांनी अजित पवारांचा पुतळा जाळून निषेध व्यक्त केला. तर पुण्यातही अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी कार्यकर्त्यांनी लावून धरली. तसेच बारामतीत देखील अजित पवार यांच्या विरोधात भाजपने आंदोलन केलं. अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात संभाजी महाराज हे स्वराज्यरक्षक होते, त्यांना धर्मवीर म्हणणे चुकीचे आहे, असे म्हटले होते. यानंतर भाजप नेत्यांनी तत्काळ अजित पवार यांच्याविरोधात रान उठवायला सुरुवात केली होती.
मार्डचा राज्यव्यापी संप (2 जानेवारी 2023)
राज्यातील निवासी डॉक्टरांनी 2 जानेवारी रोजी संप पुकारला होता. 3 जानेवारीला हा संप मागे घेण्यात आला. संपकरी निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळाने वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत मागण्यांबाबत चर्चा केली. या बैठकीत मागण्यांबाबत सकारात्मक चर्चा झाली. त्यानंतर संप मागे घेण्याची घोषणा करण्यात आली. निवासी डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत सकारात्मक चर्चा झाल्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले की, निवासी डॉक्टरांची कोणतीही गैरसोय होणार नाही, याची आम्ही काळजी घेण्यात येईल.
आमदार लक्ष्मण जगताप यांचं निधन (3 जानेवारी 2023)
पिंपरी चिंचवडमधील भाजपचे आमदार लक्ष्मण जगतापांचं (Lakshaman Jagtap) कर्करोगाच्या दुर्धर आजारानं निधन झालं. पुण्यातील आमदार मुक्ता टिळकांपाठोपाठ जगतापांच्या निधनानं भाजपचं राज्य पातळीवर मोठं नुकसान झालं आहे. लक्ष्मण जगताप हे 1986 सालापासून, सलग 16 वर्ष पिंपरी महापालिकेत नगरसेवक होते. याच काळात त्यांनी महापौर आणि स्थायी समितीची पदंही भूषवली. 2004 साली ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून आले. 2009 ते आत्तापर्यंत त्यांच्याकडे चिंचवड विधानसभेची आमदारकी होती. 2014 साली भाजपमध्ये दाखल झाल्यावर त्यांनी 2017 साली पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आणली. जगताप हे मंत्रिपदाच्या शर्यतीत असतानाच त्यांना कर्करोगानं गाठलं.
महावितरण वीज कर्मचाऱ्यांचा संप (4 जानेवारी 2023)
4 जानेवारी रोजी मध्यरात्रीपासून वीज कर्मचाऱ्यांनी पुकारलेला संप (Mahavitaran Strike Called Off) अखेर मागे घेण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि कामगार संघटनांमध्ये या संपासंदर्भात आणि वीज कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा पार पडली. या बैठकीत सकारात्मक तोडगा काढण्यात आला आणि अखेर वीज कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला.
उपमुख्यमंत्री आणि राज्याचे ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस, ऊर्जा विभागाचे अधिकारी, महावितरण, महानिर्मिती, महापारेषण विभागाचे अधिकारी आणि विविध वीज कर्मचारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांमध्ये सह्याद्री अतिथीगृहात बैठक झाली. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबोधित करताना म्हटलं होतं की, राज्य सरकारला वीज कंपन्यांचं कोणतंही खासगीकरण करायचं नाही. येत्या तीन वर्षात राज्य सरकार 50 हजार कोटींची गुंतवणूक करणार असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. दरम्यान, अदानी समूहानं समांतर परवान्यासाठी अर्ज केला. त्याच्या निषेधार्थ हा संप करण्यात आला होता. याबाबत बोलताना फडणवीस यांनी सांगितलं होतं की, समांतर परवान्याबाबत महावितरण, सरकारनं अर्ज वीज नियामक आयोगाकडे करायला हवे अशी भूमिका वीज कर्मचारी संघटनांनी मांडली होती. राज्य वीज नियामक आयोगाकडे आपल्या हिताचे निर्णय घेतला जाईल, अशी भूमिका सरकार घेईल, असं फडणवीस यांनी म्हटलं होतं. कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत सरकार सकारात्मक आहे. कामगार संघटनांनी घेतलेली भूमिका ही राज्य सरकारची भूमिका असल्याचं फडणवीस यांनी सांगितलं होतं.