Rain Forecast : वीकेंडला अवकाळी पावसाची हजेरी, या जिल्ह्यांना यलो अलर्ट
IMD Weather Update : भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे.
Unseasonal Rain Alert : राज्यासह देशात आठवड्याभरात अवकाळी पावसाने (Rain News) धुमाकूळ घातला आहे. राज्यात पुढील 24 तासात विविध ठिकाणी पावसाची हजेरी (IMD Rain Alert) पाहायला मिळणार आहे. गेल्या आठवड्याभरात पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना झोडपून काढलं आहे. या वीकेंडलाही पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील चार दिवस राज्याच पावसाची शक्यता कायम आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज आयएमडीने वर्तवला आहे. भारतीय हवामान विभागाने मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे. सोलापूर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांना पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात
राज्यातील काही भागात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. मराठवाड्यातील लातूर आणि परभणीत अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भातील अकोल्यातही अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या आहेत. भंडारा, बुलढाणा, अमरावतीमध्येही विविध ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. अवकाळी पावसामुळे रब्बी, ज्वारी, कांदा यासह फळबागांचं मोठं नुकसान झालं आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ, सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस 30-40 kmph वेगाे येण्याची शक्यता आहे. तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी https://t.co/jw7yrf8Es5 भेट द्यI pic.twitter.com/Zcv8lmztSg
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) April 9, 2024
अवकाळी पावसामुळे शेती, फळबागांचं मोठं नुकसान
अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील मळसुर भागात गारपीटीसह जोरदार पाऊस. गारपीट आणि पावसामुळे आंबा, लिंबू आणि भाजीपाला पिकांचं मोठं नुकसान झालं आहे. वादळी वाऱ्यासह झालेली गारपीट आणि पाऊस यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. नागपूरसह वर्धा, अमरावती, बुलढाणा, वाशिमसाठी नागपूर प्रादेशिक हवामान कार्यालयाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला आहे. गेल्या दोन-तीन दिवसात नागपूरसह बुलढाणा अमरावती, अकोला, भंडारा, गोंदिया या जिल्ह्याना अवकाळी पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्याने झोडपून काढलं आहे.
नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा सक्रिय
सध्या उत्तर-पश्चिम उत्तर प्रदेशच्या वरच्या भागात चक्रीवादळाच्या रूपात एक वेस्टर्न डिस्टर्बन्स तयार होत आहे आणि उत्तराखंडवर एक डिस्टर्बन्स तयार होत आहे. यासह, ओडिशा ते कॉमरीन मार्गे विदर्भ, कर्नाटक, तामिळनाडू आणि मराठवाड्यात एक चक्रीवादळ तयार होत आहे आणि बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या चक्रीवादळामुळे वातावरणात ओलावा येत आहे. 10 एप्रिल आणि 13 एप्रिल रोजी नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स पुन्हा सक्रिय होतील, यामुळे पुढील काही दिवसात पावसाची शक्यता आणखी तीव्र होईल.
उष्णतेच्या लाटेनंतर दिलासा मिळणार
उष्णतेच्या लाटेनंतर आता दिल्लीकरांना दिलासा मिळणार आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे, पुढील तीन दिवस राजधानी दिल्लीत ढगाळ वातावरण पाहायला मिळणार असून सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे कमाल तापमानात सहा अंशांपर्यंत घसरण होऊ शकते. रविवारी तापमान 33 अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :