शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या सूचना
ST Workers Protest : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावरील हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करण्यासंदर्भात सूचना दिल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी दिली आहे.
ST Workers Protest : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याला जबाबदार असणाऱ्यांवर आणि हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. शरद पवार यांच्या घरावर झालेला हा हल्ला निंदनीय आहे, असेही मुख्यमंत्र्यानी म्हटले आहे.
"एसटी कर्मचाऱ्यांच्या हितासाठी राज्य सराकार सर्व प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांसाठी कोणते निर्णय घेतले आहेत, याची माहिती मुंबई उच्च न्यायालयाला देण्यात आली आहे. न्यायालय देखील या सर्व प्रकरणी लक्ष ठेवून आहे. शिवाय यासंदर्भातील निर्णयही न्यायालयाने दिला असून आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांना कामावर परतण्यास सांगितले आहे. कर्मचाऱ्यांनी देखील न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. परंतु, आज दुपारी अचानक शरद पवार यांच्या निवासस्थानी एका जमावाने घोषणाबाजी करत दगडफेक आणि चप्पल फेक केली. अशी कृत्ये निंदनीय असून कोणालाही न पटणारी आहेत. अशा प्रकारे हिंसेला उद्युक्त किंवा प्रक्षोभ निर्माण करणाऱ्यांवर तसेच चिथावणी देणाऱ्यांवर कायद्याने कडक कारवाई झाली पाहिजे, अशा सूचना गृहमंत्र्यांना दिल्या आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, "नेत्यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबियांच्या घरांवर हल्ले करणे हा पायंडा महाराष्ट्राने कधीही पाडलेला नाही. एसटी कर्मचारी त्यांच्या मागण्यांसंदर्भात आंदोलन करत असले तरी राज्य शासनाने कधीही त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले नाही. महामंडळाचा कर्मचारी आमचाच आहे, या भावनेतून जास्तीत जास्त आर्थिक आणि सेवाविषयक लाभ देता येतील ते आम्ही दिले आहेत."
"आज घडलेल्या घटनेला प्रत्युत्तर देण्यासाठी कोणीही कायदा आणि सुव्यवस्थेला धोका पोहचेल असे कृत्य करू नये. एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांच्या भल्यासाठी नेहमीच शासन त्यांच्याबरोबर राहील. परंतु, या कर्मचाऱ्यांच्या संसाराच्या राखेवर कोणी आपल्या पोळ्या भाजू नयेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha
महत्वाच्या बातम्या
- ST Protest : एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामागे कोण आहे? याचा शोध घेणार, गृहमंत्री वळसे पाटील यांची माहिती
- ST Strike : शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन; राज्याच्या गुप्तचर यंत्रणेचे हे अपयश आहे का?
- ST Workers Protest: सुप्रिया सुळे चर्चेसाठी आल्या पण कर्मचारी आक्रमक
- ST Workers Protest : शरद पवार यांच्या निवासस्थानात घुसून चप्पल फेक; एसटी कर्मचारी आक्रमक