विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात जुन्या पावती पुस्तकाद्वारे भाविकांची लूट, एका कर्मचाऱ्याचं निलंबन
सर्वसामान्य भाविक श्रद्धेने मंदिराला देणगी पावतीद्वारे पैसे देत असतात. यंदाच्या तीन दिवसात मंदिराला अशारीतीने जवळपास 25 लाखांपेक्षा जास्त देणगी पावत्या आल्या. घायाळ सारखे अजून किती कर्मचारी मंदिराला आणि भाविकांना फसवत आहेत, याची चौकशी पोलिसांकडे गेल्याशिवाय बाहेर येणार नाही.
पंढरपूर : अवघ्या वारकरी संप्रदायाचे आराध्य असलेल्या विठ्ठल मंदिर प्रशासनाच्या गलथान कारभाराचे वाभाडे आता नित्याचेच बनू लागले आहे. गुन्हा करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी समिती मात्र अशांना कायम करुन पगारवाढीचे बक्षिस देऊ लागल्याने प्रशासन अशा कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहे का? असा प्रश्न भाविकांच्या मनात येऊ लागला आहे.
आषाढी सोहळ्यात एका बदमाश कर्मचाऱ्याने 2001 सालची जुनी पावती पुस्तके वापरुन भाविकांना हजारो रुपयाला चुना लावला. मंदिराचा नुकताच कायम झालेला कर्मचारी सिद्धेश्वर घायाळ याने दर्शन मंडपात बसून भाविकांना राजरोसपणे या जुन्या पावत्या देऊन पैसे गोळा करायला सुरुवात केली होती. एका परभणीच्या भाविकाला आपली पावती इतरांपेक्षा वेगळी असल्याचे लक्षात येताच त्याने मंदिर सुरक्षेसाठी असलेल्या पोलीस कर्मचारी वामन येलमार यांच्याकडे तक्रार केली.
एल्मर यांनी तातडीने सीसीटीव्हीच्या मदतीने घायाळ या कर्मचाऱ्याला शोधून त्याच्याकडील जुनी पावती पुस्तके घेत चौकशी केल्यावर त्याने भाविकांकडून हजारो रुपये गोळा केल्याचे समोर आले. याची माहिती मंदिर प्रशासनाला दिल्यावर प्रशासनाने या कर्मचाऱ्याला फक्त निलंबित करून गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ सुरु केली. वास्तविक 9 जुलै रोजी हा गैरप्रकार उघड झाला असून आज 15 जुलैपर्यंत अजून मंदिर प्रशासन या कर्मचाऱ्याच्या विरोधात गुन्हा दाखल करत नसल्याने प्रशासन भ्रष्ट कर्मचाऱ्यांना पाठीशी घालते आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सर्वसामान्य भाविक श्रद्धेने मंदिराला देणगी पावतीद्वारे पैसे देत असतात. यंदाच्या तीन दिवसात मंदिराला अशारीतीने जवळपास 25 लाखांपेक्षा जास्त देणगी पावत्या आल्या. घायाळ सारखे अजून किती कर्मचारी मंदिराला आणि भाविकांना फसवत आहेत, याची चौकशी पोलिसांकडे गेल्याशिवाय बाहेर येणार नाही.
यापूर्वीही मंदिराच्या लाडू विक्रीत लाखोंचा अपहार करणारा कर्मचाऱ्यावर केवळ निलंबनाची कारवाई केली होती. धक्कादायक बाब म्हणजे तो कर्मचारी यंदाच्या यात्रेत पुन्हा मंदिराच्या सेवेत दिसत होता. विठ्ठल गाभाऱ्यात भाविकाला मारहाण करणारा भाविक असो अथवा पैसे घेऊन माणसे सोडण्यावरून हाणामारी केलेले कर्मचारी असोत, हे सर्वच मंदिरात अजूनही नोकरीत असून त्यांना इतरांसोबत नोकरीत कायम करुन घसघशीत पगारवाढ करण्यात आली आहे.
मंदिर प्रशासनाकडून गैरकृत्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांना वारंवार पाठीशी घालण्याचे प्रकार संशय वाढवणारे असून मंदिरात कर्मचाऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असलेल्या चर्चेत आता घायाळ प्रकरणानंतर तथ्य असल्याचे धक्कादायक चित्र समोर येत आहे. मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले यांना त्यांच्या राजकारणातून वेळच मिळत नसल्याने प्रशासन आणि कर्मचाऱ्यांवर वचक राहिलेला नाही. मंदिरात गैरप्रकार करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांना तातडीने सेवेतून बडतर्फ करून गुन्हे दाखल करण्याची मागणी भाविकांकडून होत आहे.