Vijay Wadettiwar : 'जो मराठा समाजासाठी आडवा येतोय, त्याला निवडणुकीत आडवा करा' : विजय वडेट्टीवार
Vijay Wadettiwar : मराठा समाजाने उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणूकीत मतदान करावं, असे आवाहन विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.
Vijay Wadettiwar : मराठा समाजाला (Maratha Reservation) फसवण्याचे काम सरकारने केले, हे लपून राहिलेले नाही. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणूकीत मतदान करावं, असे आवाहन विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी केले आहे.
लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) सत्ताधाऱ्यांसह विरोधकांना धडा शिकवण्यासाठी प्रत्येक गावातून पक्षविरहित एक ते दोन उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्धार मराठा समाज बांधवांनी घेतला आहे. यावरून विजय वडेट्टीवार यांनी वरील वक्तव्य केले आहे. ते म्हणाले की, मराठा समाजाला फसवण्याचे काम सरकारने केले, हे लपून राहिलेले नाही. जुन्या चुका परत करून समाजाला न टिकणारे आरक्षण दिलेय, अशी मराठा समाजाची समज झाली आहे, किंवा त्यांना कळून चुकले आहे. तोच रोष समाजाचा सत्ताधाऱ्यांविरोधात आहे.
हे लोकशाहीसाठी योग्य नाही
मतदारावर डोळा ठेवून असे तकलादू निर्णय घेऊन असे उद्योग यापूर्वी या सरकारने केले आहे. आमची मराठा समाजाला विनंती आहे की, उमेदवार उभे करण्यापेक्षा जो मराठा समाजासाठी आडवा येतोय त्याला आडवा करण्यासाठी निवडणूकीत मतदान करावं. मनातील राग काढण्यासाठी उमेदवार उभे करणे हे लोकशाहीसाठी योग्य राहणार नाही, असे त्यांनी म्हटले आहे.
...म्हणून महाराष्ट्राची यादी जाहीर होत नाही
भाजपने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024) शनिवारी 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपच्या पहिल्या यादीत महाराष्ट्रातील उमेदवारांचा समावेश करण्यात आला नाही. याबाबत महाराष्ट्राची यादी यासाठी तयार होत नाही की, शिंदे व अजित पवार यांना आता दोन-दोन जागा द्यायच्या की तीन-तीन जागा द्यायचे की जास्तीत जास्त चार जागा द्यायच्या यावर अजून फायनल झालेले नाही. त्यांना चार-चार जागा फायनल होतील. त्यावेळेस मला वाटतं की, महाराष्ट्रातील यादी जाहीर होईल, असा टोला त्यांनी लगावला आहे.
दोन दिवसात प्रकाश आंबेडकरांबाबतचा तिढा सुटेल
प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांचा वंचित बहुजन आघाडी या पक्षाची अद्याप महाविकास आघाडीशी युती झालेली नाही. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, आमची चर्चा झाली आहे. येत्या दोन दिवसात तीनही पक्ष प्रकाश आंबेडकर यांच्याशी बोलतील. पाच किंवा सहा तारखेपर्यंत हा तिढा पूर्ण सुटलेला दिसेल.
विदर्भाची जनता काँग्रेसच्या पाठीमागे
अमित शाह हे विदर्भ दौऱ्यावर येणार आहेत. याबाबत विजय वडेट्टीवार म्हणाले की, नुकतेच पंतप्रधान येऊन गेले त्यावेळी अर्ध्या खुर्च्या रिकाम्या होत्या. भाषण सुरू असताना महिला उठून जात होत्या. त्यामुळे आता विश्वासार्हता कुठे आहे? विदर्भाची जनता काँग्रेसच्या पाठीमागे शंभर टक्के उभे राहणारी आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
युवा मेळाव्यावरून भाजपला टोला
भाजप युवा मेळाव्याबाबत विजय वडेट्टीवारांना विचारले असता ते म्हणाले की, लोकांना वेठीस धरून खाजगी गाड्या किरायाने करून मेळावा केला. हा मेळावा कार्यकर्त्यांना बळ देणार ठरतो की लोकांना वेठीस धरणारा ठरतो याचा अर्थ मतदानातून कळेल. हा पक्षाचा कार्यक्रम आहे, एवढे निवडणूकीचे बळ त्यांच्याकडे आहे की, लाख नाही दोन लाख लोक आणू शकतील, जेवढ्या गाड्या लावतील तेवढे लोक जास्त येतील, पण गाड्या लावून आणि गाडीत बसवून खाण्यापिण्याची सोय करून लोक आले तर ते पक्षाबरोबर उभे राहतात असे नाही.
ही सत्तेतून आलेल्या पैशाची मस्ती
संजय गायकवाड यांच्याबाबत विजय वडेट्टीवार यांना विचारले असता ते म्हणाले की, कारवाई करणं हे पोलिसाचं काम आहे. सरकार कुणावर कारवाई करते, बेताल वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाई करते का? गुंडाला संरक्षण देणाऱ्यावर कारवाई करते का? खून करतात, बेताल वक्तव्य करतात, महिलांबद्दल वक्तव्य करतात, माईकवरून ठार करण्याचे वक्तव्य करतात, हे सगळं सत्ता आणि सत्तेतून आलेल्या पैशाची मस्ती आहे. त्यामुळे कारवाईची अपेक्षा करणे, कितीही अन्याय झाला तरी न्याय मिळेल हा गैरसमज आहे असं मला वाटतं. एकाने कारवाई करायला सुरुवात केली तर दुसरा फोन करतो. दुसऱ्याने फोन केला की तिसऱ्याचा फोन येतो तुम्ही कारवाई करा. याचे ऐकू की त्याचे ऐकू? कोणाला नाराज करू? यामुळे राज्यात कायदा सुव्यवस्था राहिलेली नाही, असा टोला त्यांनी सरकारला लगावला आहे.
आणखी वाचा