शहीद जवानाच्या अंतिम संस्कारालाही पावसाचा फटका; एकही सरकारी अधिकारी फिरकला नाही, गावकरी संतापले
Pravin Janjal : अकोल्यातील शहीद जवान प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी येत आहे. असे असतांना मात्र जिल्हा प्रशासनाने या गावात आद्यप कुठलीही तयारी केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आलंय
Akola News अकोला : जम्मू-काश्मीरमधील (Jammu-Kashmir) कुलगाम जिल्ह्यात रविवारी दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झालेत. या चकमकीत सुरक्षा दलाच्या जवानांनी चार दहशतवाद्यांना ठार केले . मात्र या चकमकीत भारतीय सैन्य दलाचे दोन जवान शहीद असून यामध्ये महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यातील प्रवीण जंजाळ (Pravin Janjal) या जवानाचा देखील समावेश आहे. प्रवीण जंजाळ शहीद झाल्याची माहिती मिळताच त्यांच्या मोरगाव भाकरे या गावावर एकच शोककळा पसरली आहे.
अकोल्यातील (Akola News) शहीद जवान प्रवीण जंजाळ यांचं पार्थिव आज त्यांच्या मूळ गावी मोरगाव भाकरे येथे येत आहे. मात्र या परिसरात गेल्या 24 तासांपासून मुसळधार पाऊस (Heavy Rain) आहे. असे असतांना मात्र जिल्हा प्रशासनाने या गावात आद्यप कुठलीही तयारी केली नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. परिणामी गावकरी आणि शहीद प्रवीण यांचे भाऊ प्रशासना विरोधात प्रचंड आक्रमक झाले आहे. यावेळी त्यांनी एबीपी माझाशी बोलताना प्रशासनावर आपला रोष व्यक्त करत सरकारचा निषेध केला. अद्याप ही प्रशासनाचे कुठलेही अधिकारी गावात पोहचले नाहीत. त्यामुळे गावकरी चांगलेच संतापले आहे.
दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत आले वीरमरण
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यातील फ्रिसल चिन्नीगाम भागात नाकाबंदी आणि शोधमोहीम सुरु असताना सैन्य दलाची दहशतावाद्यांशी चकमक झाली. यामध्ये भारतीय सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला. तर, दोन भारतीय जवानांना वीरमरण आलं. अजून चार दहशतवादी लपून बसल्याची शंका सुरक्षा दलांना आहे. या घटनेत अकोल्यातील जवान प्रवीण जंजाळ हे देखील शहीद झाले. आपल्या गावचा लेक सीमारेषेवर धारातिर्थी पडल्याचं समजताच गावावर शोककळा पसरली. दहशवाद्यांशी लढताना प्रवीण यांच्या डोक्याला गोळी लागली. रेजिमेंटकडून गावच्या सरपंच उमाताई माळी यांना फोनद्वारे संपर्क साधून ही माहिती देण्यात आली.
4 महिन्यांपूर्वीच झाले होते लग्न
प्रवीण जंजाळ हे सेकंड महार रेजिमेंटमध्ये 2020 मध्ये भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. भरतीनंतर त्यांची पोस्टिंग मणिपूरमध्ये होती, पण 4 महिन्यांपूर्वी सैन्य दलाच्या राष्ट्रीय रायफलच्या क्रमांक एकच्या तुकडीत त्यांना कुलगाम जिल्ह्यात पाठविण्यात आले होते. विशेष म्हणजे नुकतेच 4 महिन्यांपूर्वी ते स्वत:च्या लग्नासाठी गावी आले होते, मोठ्या उत्साहात आणि आनंदात त्याचा विवाहसोहळा संपन्न झाला. मात्र, लग्नाच्या सुट्टीनंतर पुन्हा सीमारेषेवरील कर्तव्य ड्युटीवर ते रुजू झाले ते परतलेच नाहीत. लग्नासाठी गावी दिलेली भेट ही प्रवीण यांची अखेरची भेट ठरली. त्यामुळे, गावात हळहळ व्यक्त होत आहे. प्रवीण यांचे प्राथमिक शिक्षण गावात तर बारावीपर्यंतचे शिक्षण गायगाव येथे झाले आहे. त्यांच्या शहीद झाल्याचे वृत्त समजताच एकत्र येत, त्यांच्या मित्रांनी प्रवीण यांच्या गावातील शेवटच्या भेटीतील आठवणींनी रात्र जागून काढली. प्रवीण यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील, मोठा भाऊ असा परिवार आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या