मोठी बातमी! अखेर उजनी प्लसमध्ये, 5 दिवसांत धरण शंभरी गाठणार; सोलापूरला मोठा दिलासा
सोलापूर (Solapur) आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्वाचे असणारे उजनी धरण (Ujani Dam) अखेर प्लसमध्ये आले आहे. आज सकाळी 9 वाजता धरणाने शू्न्य पातळी ओलांडली आहे.
Ujani Dam Water News : सोलापूर (Solapur) आणि पुणे (Pune) जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी (Farmers) महत्वाचे असणारे उजनी धरण (Ujani Dam) अखेर प्लसमध्ये आले आहे. आज सकाळी 9 वाजता धरणाने शू्न्य पातळी ओलांडली आहे. ऐतिहासिक नीचांकी पातळीनंतर केवळ 54 दिवसात उजनी धरण मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आले आहे. गेल्या 54 दिवसात धरणात तब्बल 33 टीएमसी पाणी आले आहे. असाच पाऊस सुरु राहिल्यास धरण पुढील 5 दिवसात 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस सुरु आहे. त्यामुळं धरणाच्या पाणीसाठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा मायनसमधून प्लसमध्ये गेलं आहे. यामुळं शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान पाहायला मिळत आहे. पुणे जिल्ह्यात जोरदार पाऊस झाल्यामुळं तेथील धरणासाठ्यात मोठी वाढ झालीय. त्यामुळं पुणे जिल्ह्यातील धरणातून उजनी धरणात पाण्याचा विसर्ग सुरु आहे.
उजनी धरणात 1 लाख 60 हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरु
ऐतिहासिक नीचांकी पातळी गाठल्यानंतर केवळ 54 दिवसात उजनी पुन्हा मृत साठ्यातून जिवंत साठ्यात आले आहे. असाच पाऊस पुढील चार ते पाच दिवस राहिल्यास उजनी धरण या पाच दिवसात 100 टक्के भरणार आहे. सध्या उजनी धरणात 1 लाख 60 हजार क्युसेक्सने पाणी जमा होत आहे. दुपारनंतर ही आवक 2 लाख क्युसेक्सपर्यंत वाढणार आहे. या पद्धतीच्या पाण्याच्या आवकेमुळं आज रात्रीपर्यंत धारण 25 टक्के जिवंत साठ्यात पोहोचणार असल्यानं पुढील चार ते पाच दिवसात धरण 100 टक्क्यांची पातळी गाठू शकणार आहे. गेल्या वर्षीच्या भीषण पाणी टंचाईमुळं उजनी धरण इतिहासातील सर्वात नीचांकी म्हणजे वजा 60 टक्के इतक्या निचांकी पातळीला पोहोचले होते. मात्र, जून सुरु होताच पावसाने साथ दिल्याने धरणात हळू हळू पाणी जमा होण्यास सुरुवात झाली आहे. गेल्या चार दिवसतातील पावसाने धरणात मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्यानं 26 जुलै रोजी सकाळी 9 वाजता धरणाने शून्य पातळी ओलांडत जिवंत साठ्यात प्रवेश केला आहे.
उद्या सकाळी उजनी धरण 25 टक्के पातळी ओलांडणार
सध्या पुणे, लोणावळा, भीमाशंकर या परिसरात जोरदार पाऊस सुरु आहे. त्यामुळं मुळा, मुठा, इंद्रायणी या भीमा खोऱ्यातील नद्यांतून मोठा विसर्ग उजनीकडे येत आहे. लोणावळा परिसरातील पावसामुळं सध्या खडकवासला 14 हजार, मुळाशी 11 हजार, चासकमान 6 हजार, कासारसाई 1600, पवना 2 हजार तर भीमाशंकर परिसरातील पावसामुळं वाडीवाले धरणातून 2200 क्युसेक विसर्गाने पाणी सोडले जात आहे. थोड्या थोड्या वेळाने पावसाची परिस्थिती पाहून हे आकडे सातत्याने कमी जास्त होत आहेत. काल सोडलेल्या पाण्यामुळे आज दुपारीनंतर उजनी धरणात तब्बल 2 लाख क्युसेक्स विसर्गाने पाणी जमा होऊ लागणार आहे. पाण्याची तुफानी आवक पाहता उद्या सकाळी उजनी धरण 25 टक्के पातळी ओलांडणार असून असाच पाऊस सुरु राहिला तर मात्र पुढील चार दिवसात धारण 100 टक्के भरण्याची शक्यता आहे.
महत्वाच्या बातम्या: