मुंबईत काल मंगलमूर्ती आणि 'अमंगलमूर्ती' पाहिले, जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू; उद्धव ठाकरे यांचा अमित शाहांना टोला
Uddhav Thackeray : निष्ठाही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मुंबई :. मुंबई महापालिका निवडणूक तोंडावर आलेली असताना आता शिवसेना विरुद्ध भाजपमधील संघर्ष अधिक तीव्र होताना दिसतोय. अमित शाहांनी मुंबई दौऱ्यात उद्धव ठाकरेंना जमीन दाखवण्याची भाषा केल्यानंतर आज उद्धव ठाकरेंनी प्रत्युत्तर दिलंय. मुंबईत काल मंगलमूर्ती आणि अमंगलमूर्ती बघितले कारण गणपतीच्या मंडपात देखील राजकारण दिसलं. आम्हाला जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू असा इशारा ठाकरेंनी दिलाय. सोबतच उद्धव ठाकरेंनी बंडखोरांपेक्षा सोबत असलेले मुठभर निष्ठावंत कधीही बरे असं म्हणत शिंदे गटावरही निशाणा साधला.
नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे
मुंबईतल्या राजकारणावर वर्चस्व केवळ भाजपचं असावं. आता वेळ आली आहे की उद्धव ठाकरेंना जागा दाखवली पाहिजे या अमित शाह यांच्या वक्तव्याचा उद्धव ठाकरेंनी चांगलाच समाचार घेतला. उद्धव ठाकरे म्हणाले, जमीन दाखवण्याची भाषा करणाऱ्यांना अस्मान दाखवू. त्यांना बोलायचं ते बोलू द्या. थोडक्यात काय तर संघर्षाचा काळ आहे. शिवसेना संपवायला निघाले आहे. निष्ठाही कितीही बोली लावली तरी विकली जाऊ शकत नाही. नासलेल्या लोकांपेक्षा मूठभर निष्ठावंत कधीही बरे आहे.
माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक
उद्धव ठाकरे म्हणाले, मुख्यमंत्रीपद ही माझी खासगी मालमत्ता नाही मुख्यमंत्री पद हवं असतं तर मी क्षणभरात सोडल असते. माझ्याकडे तेव्हाही 30-40 आमदार होते तेव्हाही त्यांना डांबून ठेवलं असतं. माझी देखील ममता बॅनर्जीकडे ओळख होती त्या आमदारांना तिकडे घेऊन गेलो असतो. किमान कालीमातेच्या मंदिरात नेलं असतं, राजस्थानात त्यांना नेता आलं असत पण तो माझा स्वभाव नाही. त्यामुळे सर्वांना सांगितलं की, दरवाजा उघडा आहे. राहायचं असेल तर निष्ठेने राहा नसेल तर तिकडे जा. आता माझ्यासोबत निष्ठावंत कडवट शिवसैनिक आहेत.
दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच होणार
यंदाच्या दसरा मेळाव्यात शिवाजी पार्कवर उद्धव ठाकरेंचा आवाज घुमणार असा दावा शिवसेनेकडून केला जातोय. त्यामुळे शिंदे गट या मैदानासाठी ताकद लावणार हे आता स्पष्ट झालंय. त्यामुळे ठाकरे आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला जाण्याची शक्यता आहे. आता गणपती आहे, त्यानंतर दसरा आहे, त्यावेळी दसरा मेळाव्याचं बघू असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं. यावर देखील उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे म्हणाले, दसरा मेळावा शिवाजी पार्क येथेच घ्यायचा आहे. दसरा मेळाव्यात मी सविस्तर आतापर्यंत बोलेल. मुख्यमंत्री पदाचा मास्क असायचा बोलताना जपून बोलावं लागायचं आता तसं नाही आहे.























