Tiger Death : नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाचा रक्तरंजित खेळ; नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्त
Gondia News: नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव प्रकल्पात (Navegaon Nagzira Tiger Reserve) सलग दुसऱ्या दिवशी आणखी एका वाघाचा मृतदेह आढळल्याने नागझिरा प्रशासन हादरले आहे.
Gondia News गोंदिया : गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये (Navegaon Nagzira Tiger Reserve) गेल्या दोन दिवसांमध्ये दोन वाघाचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे वन्यजीव प्रेमींकडून मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गोंदिया जिल्ह्यातील नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये मोठ्या प्रमाणात वाघ असल्याने पर्यटक सुद्धा या ठिकाणी व्याघ्र दर्शन आणि पर्यटनाला येत असतात. परंतु गेल्या दोन दिवसात दोन वाघाचा मृत्यू (Tiger Death) झाल्याची घटना समोर आल्याने वन्यप्रेमीसह नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. दरम्यान या दोन वाघांचा मृत्यू त्यांच्या वर्चस्वाच्या लढाईत झाल्याची माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
नव्या वाघाच्या शोधासाठी विविध ठिकाणी कॅमेरे अन् गस्तीत वाढ
नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पामध्ये 22 सप्टेंबरला गस्तीवर असलेल्या वन कर्मचाऱ्यांना T-9 वाघ मृत अवस्थेत आढळून आला. त्यानंतर याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देण्यात आली. त्यानुसार सर्व वनअधिकारी आणि पशुवैद्यकीय अधिकारी यांच्या एक समिती घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी पाहणी केली. त्यानंतर या समितीद्वारा या वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. दोन वाघाच्या वर्चस्वाच्या लढाईमध्ये T-9 वाघाचा मृत्यू झाल्याचे यावेळी सांगण्यात आले. तर लगेच 23 सप्टेंबरला पुन्हा T-4 वाघिनीचा एक बछडा हा कुजलेल्या मृत अवस्थेत आढळला. तीन दिवसापूर्वीच त्याचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्याच्या शरीरावर सुद्धा अनेक खुणा आढळून आल्या. त्यामुळे नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नवीन वाघाचा प्रवेश झाला असून नवीन वाघ आपलं वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी इतर वाघांना इजा पोचवत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. तर हा नवीन वाघ कोणत्या भागातून आलाय? याच्या शोध घेण्यासाठी ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले असल्याची ही माहिती वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
कशी असते वर्चस्वाची लढाई
जाणकारांच्या मते नवीन वाघ एखाद्या जंगलात प्रवेश करतो तेव्हा त्या जंगलात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी तेथील स्थायी प्रमुख वाघासोबत लढाई करून त्याला ठार करतो. तर त्यानंतर त्या वाघाच्या छाव्यांनाही ठार करून आपले वर्चस्व प्रस्थापित करतो, अशी समज आहे. तेव्हा काल, टी-9 वाघ तर आज, त्याच्या छाव्याचा मृतदेह आढळून आल्याने नागझिऱ्याच्या जंगलात नवीन वाघाने एंट्री केली असून वर्चस्वासाठी वाघांचा रक्तरंजित खेळ सुरू झाल्याचे दिसून येत आहे.
कोण होता टी-9?
'टी-9' उर्फ 'बाजीराव' वयाच्या बाराव्या वर्षी वर्चस्वाच्या लढाईत मरण पावला. बाजीराव हा मूळ ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पाच्या कोळसा वन परीक्षेत्रातील वाघ होता. डिसेंबर-2016 मध्ये हा वाघ ताडोबावरून वाघांच्या नियमित नैसर्गिक भ्रमण मार्गाने नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या नागझिरा जंगलात स्थलांतर करून आला होता. तब्बल नऊ वर्ष त्याने या जंगलावर आपले अधिराज्य गाजवले. मात्र, काल, त्याचा तर आज त्याच्या छाव्याचा दुसऱ्या नर वाघासोबत झालेल्या झुंजीत मृत्यू होऊन वर्चस्व संपला आहे.
हे ही वाचा