गडचिरोलीत टिपागड दलमचा कुख्यात कमांडर यशवंत बोगाला पत्नीसह अटक
हत्तीगोटा, मरकेगाव हत्याकांड आणि दादापूर भीषण जाळपोळीत तो पोलिसांना हवा होता. त्याच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षिस होते. त्याची पत्नी शारदा नैताम याच दलममध्ये सदस्य होती.
गडचिरोली : गडचिरोलीत टिपागड दलमचा कुख्यात कमांडर यशवंत बोगा याला पत्नीसह अटक करण्यात आली आहे. 2019-20 वर्षात गडचिरोली पोलीस दलाने वरिष्ठ नक्षलवादी कॅडरचे कंबरडे मोडले आहे. गेल्या दोन वर्षात 2 विभागीय नक्षल समिती सदस्य -8 उपकमांडर-4 दलम कमांडरला अटक झाली आहे. पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल यांच्याकडून गडचिरोली पोलीस दलाचे अभिनंदन केले आहे. दुसऱ्या एका घटनेत दोन जहाल नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले. शासनाने एकूण 9 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
गडचिरोली पोलीस दलाच्या नक्षलविरोधी अभियानाला आज मोठे यश मिळाले आहे. गडचिरोली पोलीस दलाने जहाल वरिष्ठ नक्षलवादी व टिपागड दलमचा डिव्हीसीएम यशवंत ऊर्फ दयाराम अंकलु बोगा -35 वर्ष याला त्याची पत्नी व जहाल नक्षली टिपागड दलम सदस्य शारदा ऊर्फ सुमित्रा पितुराम नैताम वय 32 वर्ष यांना आज अटक करण्यात यश मिळवले आहे. जहाल नक्षली यशवंत बोगा हा सन 2009 मध्ये टिपागड दलममध्ये भरती होऊन नक्षल चळवळीत दाखल झाला होता. सध्या तो टिपागड दलमच्या डीव्हीसीएम पदावर कार्यरत होता. त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण 78 गुन्हे दाखल आहेत.
हत्तीगोटा, मरकेगाव हत्याकांड आणि दादापूर भीषण जाळपोळीत तो पोलिसांना हवा होता. त्याच्यावर 16 लाख रुपयांचे बक्षिस होते. त्याची पत्नी शारदा नैताम याच दलममध्ये सदस्य होती. तिच्यावर 47 गंभीर गुन्हे दाखल आहेत. तिच्यावर 2 लाखांचे बक्षिस होते. गडचिरोली पोलीस दलाने सन 2019- 20 मध्ये ऐतिहासिक कामगिरीची नोंद करत नक्षलवाद्यांच्या वरिष्ठ कॅडरला लक्ष्य केले. गेल्या 2 वर्षात गडचिरोली पोलीस दलाने 2 डिकेएसझेडसी सदस्य, 8 डिव्हीसीएस, 4 दलम कमांडर व 3 दलम उपकमांडर यांना अटक, ठार अथवा त्याचे आत्मसमर्पण करण्यात यश मिळविले आहे.
गडचिरोली पोलीस दलाच्या या कामगिरीमुळे गडचिरोली जिल्ह्यातील वरिष्ठ नक्षलवादी नेते नेस्तनाबूत करण्यात यश मिळाले आहे. दरम्यान दुसऱ्या एका घडामोडीत दोन जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले आहे. गेल्या दोन वर्षात 4 डिव्हीसीसह एकूण 37 नक्षलवादयांनी आत्मसमर्पण केले आहे. या दोघांवर शासनाने एकुण 9 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 1) जतिन तुमरेटी - असे यातील एकाचे नाव आहे. जून 2016 मध्ये चातगाव दलममध्ये दाखल झाला होता. त्याच्यावर एकूण साडेचार लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. 2) रंजना उर्फ ज्योती दोगे मलामी हीने देखील आज आत्मसमर्पण केले असून ती सध्या गटटा दलममध्ये कार्यरत होती. तिच्यावर देखील साडेचार लाखांचे बक्षिस जाहीर करण्यात आले होते.