Top Headlines Today : जाणून घ्या आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय महत्त्वाच्या घडामोडी
National News : एबीपी माझा प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

मुंबई: राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.
मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण, महाराष्ट्रात काय होणार?
मध्य प्रदेशमध्ये ओबीसींना राजकीय आरक्षण मिळाल्यानंतर आता ठाकरे सरकार कोणतं पाऊल उचलणार याकडे सर्वांचं लक्ष आहे. ओबीसी आरक्षणासह निवडणुका घेण्यास सुप्रीम कोर्टाने मध्य प्रदेश सरकारला परवानगी दिली आहे. पण महाराष्ट्राच्या बाबतीत वेगळी भूमिका घेतल्याचे दिसतंय. चारच दिवसापूर्वी कोर्टाने महाराष्ट्राला ज्या सूचना केल्या होत्या त्याच सूचना मध्य प्रदेश सरकारलाही केल्या होत्या. मग चार दिवसात असा काय चमत्कार झाला. असा प्रश्न राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या मुद्द्यावर आज दिवसभर राजकीय प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
ज्ञानवापी प्रकरणी सर्वोच्च न्यायालय आणि वाराणसी कोर्टात आज सुनावणी
वाराणसी जिल्हा कोर्टात ज्ञानवापी सर्व्हे संदर्भात अॅडव्होकेट कमिश्नर विशाल सिंह आज दुपारी 2 वाजता आपला रिपोर्ट सादर करणार आहेत. तसेच अन्य दोन याचिकांवर सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. एका याचिकेत प्रतिवादी महिलांनी नंदीच्या समोरची भिंत तोडून तपास करण्याची मागणी केली आहे. दुसरी याचिका सरकारी वकिलांकडून दाखल करण्यात आली आहे. यामध्ये तीन मुद्यांवर भर देण्यात आला. मात्र वकिलांच्या संपामुळे बुधवारी सुनावणी होऊ शकली नाही.
सर्वोच्च न्यायालयात वाराणसीचे अंजुमन इंतजामिया मशिदीने याचिका केली आहे. ज्यात खालच्या कोर्टाने दिलेले सर्व आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. मंगळवारी झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने त्या परिसरात सापडलेले शिवलिंग सुरक्षित करायला सांगितले होते आणि मुस्लिमांना नमाजासाठी परवानगी दिली होती. आज या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात दुपारी 12 वाजता सुनावणी होणार आहे.
संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज सुनावणी
संदीप देशपांडे यांच्या अटकपूर्व जामीनावर आज फैसला होणार आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या जामीनाला मुंबई पोलिसांनी जोरदार विरोध केला असून हे दोघेही अद्याप फरार आहेत. पोलिसांच्या कामात अडथळा, ताब्यात घेत असताना एक महिला पोलीस जखमी झाल्या होत्या. त्या गाडीचा चालक आणि गाडीत बसलेल्या मनसे शाखाध्यक्षांच्या जामीनावरही कोर्ट आज निर्णय देणार आहे.
बालगंधर्व पाडण्यास कलाकारांचा विरोध, आज आंदोलन
पु ल देशपांडे यांच्या संकल्पनेतून उभं राहिलेलं पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर पुनर्विकासाच्या नावाखाली पाडण्याचे प्रयत्न पुन्हा एकदा सुरु झाले आहेत. यावेळी त्यासाठी भाजपला राष्ट्रवादी काँग्रेसची साथ लाभली आहे. दोन वर्षांपूर्वी बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा डाव पुणेकरांच्या विरोधामुळे उधळला होता. त्यावेळी राष्ट्रवादीकडून देखील बालगंधर्व रंगमंदिर पाडण्यास विरोध करण्यात आला होता. मात्र आता पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडून जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बालगंधर्व रंगमंदिरच्या पुनर्विकासाचे प्रेझेंटेशन देण्यात आलं. यानंतर अजित पवार यांनी त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे. याच मुद्द्यावर, बालगंधर्व रंगमंदीर पाडण्यास विरोध करण्यासाठी सकाळी 10 वाजता कलाकार आंदोलन करणार आहेत.
हवामान बदलासंबंधी जागतिक संघटनेकडून अहवाल प्रसिद्ध
हवामान बदलासंदर्भातले जबाबदार घटनांमध्ये अनेक उच्चांक बघायला मिळतायत. 2021 सालात यातील 4 प्रमुख घट असलेल्या ग्रीनहाऊस गॅसेसची पातळी, महासागराचे तापमान, त्याचे ॲसिडिफिकेशन आणि समुद्राच्या पाणी पातळीत होत असलेली वाढ यांनी नवा उच्चांक गाठलाय. जागतिक हवामान संघटनेकडून क्लायमेट चेंजसंदर्भातला महत्त्वपूर्ण रिपोर्ट प्रसिद्ध करण्यात आलाय. भारतसोबतच इतर देशांना हा अहवाल धोक्याचा इशारा आहे.
श्रीकृष्ण जन्मभूमीसंबंधी आज सुनावणी
श्रीकृष्ण जन्मभूमी मथूरा येथील शाही ईदगाह संदर्भात वकील रंजना अग्निहोत्री आणि इतर कृष्ण भक्तांनी दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. यात 1969 साली श्रीकृष्ण जन्मस्थळ सेवा समिती आणि शाही ईदगाह व्यवस्था समिती मध्ये झालेला करार अवैध असल्याचा दावा केला आहे. कारण या दोन्ही समितीला असा करार करण्याचे काही अधिकार नसल्याचं म्हटलं आहे. यावर आज ही याचिका सुनावणी योग्य आहे की नाही यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज श्री. स्वामीनारायण मंदिराकडून आयोजित करण्यात आलेल्या युवा शिबिराला सकाळी 10.30 वाजता संबोधित करणार आहेत.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून कार्यक्रम
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीकडून आयोजित 'वंशवादी राजनीतिक दलो से लोकतांत्रिक शासन को खतरा' या विषयावर एक संमेलन आयोजित करण्यात आलं आहे. यात भाजप अध्यक्ष जे पी नड्डा आणि राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस सहभागी होणार आहेत. हा कार्यक्रम सकाळी 11 वाजता होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
