Todays Headline: भारत जोडो यात्रेचा आठवा दिवस, महागाई दराचे आकडे जाहीर होणार; आज दिवसभरात
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.
मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा आजचा आठवा दिवस आहे. भारत जोडो यात्रा सध्या हिंगोली जिल्ह्यात आहे. विधानपरिषदेतील प्रलंबित असलेल्या 12 नामनिर्देशित आमदारांच्या याचिकेवर आज उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. तसेच अनिल देशमुख यांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. या महत्वाच्या बातम्यांसह आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम, घटना-घडामोडींबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची थोड्यात माहिती देणार आहोत.
भारत जोडो यात्रेचा आज आठवा दिवस
रविवारच्या विश्रांतीनंतर आज पुन्हा राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास सुरू होणार आहे. आज सकाळी 6.30 वाजता कळमनुरी, हिंगोलीतून पदयात्रेला सुरूवात होणार आहे. तर सायंकाळी 7 वाजता हिंगोलीतील माळहीवरा येथे कॉर्नर सभा होणार आहे आणि त्याच ठिकाणी आजचा मुक्काम असणार आहे.
नामनिर्देशित 12 आमदारांच्या याचिकेसंबंधी आज सुनावणी
विधान परिषदेवरील 12 नामनिर्देशित आमदारांच्या प्रलंबित नियुक्तीसंदर्भातील याचिकेवर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. महाविकास आघाडी सरकार आणि राज्यपाल यांच्यातील शीतयुद्धात बारगळलेल्या नियुक्त्या सरकार बदललं तरीही अद्याप प्रलंबितच आहेत. शिंदे-फडणवीस सरकारनं जुनी यादी रद्द केली असली तरी नव्या नियुक्त्या कधी हा प्रश्न अद्याप अनुत्तरीतच आहे. त्यासंदर्भात हायकोर्टात दाखल याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.
ऑक्टोबरमधील महागाईच्या दराचे आकडे जाहीर होणार
ऑक्टोबरमधील महागाई दराचे आकडे आज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाकडून जाहीर केले जाणार आहे. सणासुदीच्या काळात महागाई वाढ झाली आहे की सर्वसामान्यांना महागाईपासून दिलासा मिळाला हे यातून कळणार आहे. दरम्यान, रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ऑक्टोबर महिन्यातील महागाई दर 7 टक्क्यांपेक्षा कमी असेल असं भाकीत वर्तवलंय. त्यामुळे महागाईपासून दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल देशमुखांच्या जामीन याचिकेवर आज सुनावणी
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या सीबीआय प्रकरणातील जामीनावर आज हायकोर्टात सुनावणी होणार आहे. एका न्यायमूर्तींनी सुनावणी घेण्याचं नाकारल्यानंतर देशमुखांचे वकील अनिकेत निकम यांनी शुक्रवारी हे प्रकरण तातडीनं न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्यापुढे सुनावणीसाठी सादर केलं होतं. तेव्हा न्यायमूर्ती शिंदे यांनी त्यांना हे प्रकरण सोमवारी पुन्हा सादर करण्याची मुभा दिली आहे, त्यानुसार आज यावर सुनावणी होईल.
सोलापुरातल्या भीमा कारखान्याच्या निवडणुकीचा निकाल
सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या काडाडी मंगल कार्यालयात भीमा सहकारी साखर कारखान्याची आज मतमोजणी होणार आहे. भाजप खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र विश्वराज महाडिक विरूध्द राष्ट्रवादीचे माजी आमदार राजन पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला आजपासून सुरुवात
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा वर्गाला आजपासून सुरुवात होत आहे. नागपुरात संघाच्या रेशीम बाग परिसरातील डॉ. हेडगेवार स्मृती भवन परिसरात हा संघ शिक्षा वर्ग होणार आहे. विशेष म्हणजे संघ शिक्षा वर्ग दरवर्षी उन्हाळ्यात होते. यावर्षीही उन्हाळ्यात संघ शिक्षा वर्ग झाले होते. मात्र कोरोनामुळे मागील दोन वर्ष संघ शिक्षा वर्ग न होऊ शकल्यामुळे यंदा एका वर्षात दुसऱ्यांदा संघ शिक्षा वर्ग होत आहे. यंदा संघ शिक्षा वर्गात देशभरातील सुमारे 700 स्वयंसेवक सहभागी होणार आहेत.
पंतप्रधान मोदी G-20 गटाच्या शिखर संमेलनासाठी रवाना होणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी G-20 शिखर संमेलनासाठी बालीला रवाना होणार आहेत. रशिया- युक्रेन संघर्षासह अनेक वैश्विक विषयांवर या संमेलनात चर्चा होईल. अमेरिकेचे राष्ट्रपती ज्यो बायडन, इंग्लंडचे पंतप्रधान ऋषी सुनक, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन, चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग आदी नेते या संमेलनात सहभागी होणार आहेत. काही नेत्यांसोबत पंतप्रधान मोदींची द्विपक्षीय बैठकही होणार आहे.
जागतिक मधुमेह दिन
आज जागतिक मधुमेह दिवस आहे. चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि शारीरिक कसरतींचा अभाव यामुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाब यासारख्या आजारांचे प्रमाण जगभरात वाढत असताना मुंबईत 18 ते 69 वर्ष या वयोगटातील सुमारे 18 टक्के व्यक्तींमध्ये रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक आढळले आहे. तर 2021 मध्ये 14 टक्के लोकांच्या मृत्यूचे कारण मधुमेह आले आहे. मुंबईत 17 टक्के महिलांना तर 18 टक्के पुरुषांमध्ये साखरेचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे या संदर्भात महापालिका जनजागृती करून मधुमेह आजारापासून नागरिकांना दूर ठेवण्यासाठी पाऊलं उचलली जाणार आहेत.