नवीन वाहन कायद्याचा धसका, बेळगावात वाहन चालकाने हेल्मेटवरच चिकटवली कागदपत्रे
देशात 1 सप्टेंबरपासून नवीन मोटर वाहन कायदा 1988 लागू करण्यात आला आहे. नव्या नियमांनुसार दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले असून दंडांच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.
बेळगाव : नवीन मोटार वाहन नियमाचा वाहन चालकांनी चांगलाचा धसका घेतला आहे. कारवाई टाळण्यासाठी वाहन चालक सर्वोतोपरी काळजी घेत आहेत. बेळगामध्ये एका व्यक्तीने एक पाऊल पुढे जात कारवाई टाळण्यासाठी नामी शक्कल लढवली आहे. गाडीची सर्व कागदपत्रे या व्यक्तीने आपल्या हेल्मेटवर चिकटवली आहेत.
बेळगावातील चिकोडी गावच्या चंद्रकांत हुक्केरी यांनी ही नामी शक्कल लढवली आहे. चंद्रकांत यांचं हेल्मेट त्यामुळे सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. चिकोडी येथे पोलीस वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी चंद्रकांत यांनी आपली बाईक थांबवून हेल्मेटवर चिकटवलेली सगळी कागदपत्रे वाहतूक पोलिसांना दाखवली.
ड्रायव्हिंग लायसन्स, पीयूसी, विमा पॉलिसी आणि वाहनाचे आरसी बूक चंद्रकांत यांनी आपल्या हेल्मेटवर चिकटवले आहे. ही भन्नाट आयडिया पाहून पोलिसांनीही त्यांचे कौतुक वाटले. दुचाकी घेऊन बाहेर जाताना मी नेहमी हेल्मेट घेऊनच जातो. हेल्मेटवर कागदपत्रे चिकटवली असल्यामुळे कागदपत्रे विसरण्याचा प्रश्नच येत नाही, असं चंद्रकांत हुक्केरी यांनी सांगितलं.
देशात 1 सप्टेंबरपासून नवीन मोटर वाहन कायदा 1988 लागू करण्यात आला आहे. मोटर वाहन कायद्यात दुरुस्ती केल्यानंतर वाहतूक नियमांचं उल्लंघन केल्यावर होणाऱ्या दंडात्मक कारवाईत बदल करण्यात आले असून दंडांच्या रकमेत मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आली आहे.
केंद्र सरकारने लागू केलेला नवीन मोटार वाहन कायदा तुर्तास महाराष्ट्रात लागू होणार नाही, असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी स्पष्ट केलं आहे. दंडांची रक्कम अवाजवी असून ती कमी करण्यात यावी, अशी मागणी दिवाकर रावतेंनी केंद्र सरकारकडे केली आहे.