यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. यासंदर्भात पोलीस अधीक्षक आज दुपारी पत्रकार परिषद घेणार आहेत.
अहमदनगर : यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे. त्यांच्या हत्येचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. पोलीस अधीक्षक आज दुपारी या संदर्भात पत्रकार परिषद घेणार असून पोलीस त्यामध्ये हत्येचं कारण आणि खरा सूत्रधार कोण याबाबत माहिती देतील अशी शक्यता आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची 30 नोव्हेंबर रोजी निर्घृण हत्या करण्यात आली होती. पारनेर तालुक्यातील जातेगाव इथल्या घाटात हल्लेखोरांनी रेखा जरे यांच्यावर धारदार शस्त्राने वार करुन त्यांची हत्या केली होती.
रेखा जरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यकर्त्या होत्या. 2014 च्या निवडणुकीनंतर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. चार वर्षांपूर्वी रेखा जरे यांनी महिला सक्षमीकरणासाठी यशस्विनी महिला ब्रिगेड ही संघटना स्थापन केली. मात्र 30 नोव्हेंबरला पुण्यातून आपलं काम आटोपून मुलगा आणि आईसोबत नगरकडे येत असताना त्यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला. नगर-पुणे महामार्गावरील पारनेर तालुक्यातील जातेगाव फाटा घाटात अज्ञातांनी धारदार शस्त्राने वार करुन रेखा जरे यांची हत्या केली.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरे यांची अहमदनगरमध्ये हत्या
या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. आरोपींच्या शोधासाठी सुपा पोलीस ठाणे, पारनेर पोलीस स्टेशन, एमआयडीसी पोलीस स्टेशन, तोफखाना पोलीस स्टेशन आणि स्थानिक गुन्हे शाखा अशी पाच पथकं नेमून रवाना केली होती.
सुपा पोलीस ठाण्यात या हत्येप्रकरणी अज्ञातांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता तीन जणांना पोलिसांनी अटक केली आहे. परंतु रेखा जरे यांच्या हत्येचं नेमकं कारण काय हे अद्याप समजलेलं नाही. पोलिसांच्या पत्रकार परिषदेनंतरच याचा उलगडा होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा रेखा जरेंची हत्या,पूर्वनियोजित कट असल्याचा संशय | स्पेशल रिपोर्ट