गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही : जयंत पाटील
गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असं राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी बोलताना सांगितलं. तसेच महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

नवी दिल्ली : गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांनंतर आता राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची तब्बल अडीच तास बैठक झाली. या बैठकीनंतर गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, अशी माहिती राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांनी दिली आहे. तसेच महत्त्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न होतोय, असा आरोपही जयंत पाटील यांनी यावेळी बोलताना केला आहे.
जयंत पाटील बोलताना म्हणाले की, "गृहमंत्र्यांचा राजीनामा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. जो प्रमुख मुद्दा आहे, जी प्रमुख घटना झालेली आहे, त्यावरून लक्ष विचलीत करण्याची कोणतीही आवश्यकता नाही. अंबानींच्या घरासमोर जे वाहन ठेवलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या, याचा शोध यावरच आमचं लक्ष आहे. यानंतर यथायोग्य उर्वरीत गोष्टी होतील."
"सध्या एटीएस व एनआयए या प्रकरणाची चौकशी करत आहे. या चौकशीच्या माध्यमातून काही ना काही ठोस अशा गोष्टी बाहेर येतील, असा आम्हाला विश्वास आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस याचं ठाम मत आहे की, जे गुन्हे झालेले आहेत, अंबानींच्या घराबाहेर जे वाहन सोडण्यात आलं आणि मनसुख हिरेन यांची हत्या याबाबतीत खोलात जाऊन ज्यांनी हे गुन्हे केलेले आहेत, त्यांना शोधून काढण्याचं काम ज्या यंत्रणा करत आहेत, त्यांचा तपास पूर्ण होणं आवश्यक आहे आणि मला खात्री आहे लवकरात लवकर तो तपास पूर्ण होईल.", असंही जयंत पाटील यांनी बोलताना सांगितले.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रीमंडळातील अनेकांवर आरोप झाले, त्यांनी कुणालाही राजीनामा द्यायला लावला नाही. मी त्या खोलात जाणार नाही, त्यांच्याशी आमची काही त्याबाबतीत स्पर्धा नाही. परंतु जसं समोर येतंय की महत्वाच्या गुन्ह्यापासून लक्ष विचलीत करण्याचा कुणाचा जर प्रयत्न सुरू असेल, तर ते देखील होता कामा नये."
गृह विभाग नेमकं कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? : देवेंद्र फडणवीस
"या प्रकरणाची चौकशी जोपर्यंत गृहमंत्री आपल्या पदावर आहेत, तोपर्यंत होऊच शकत नाही, त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा घेऊन त्यानंतरच चौकशी केली पाहिजे. खरंतर आता गृहखातं कोण चालवतं हाही आमच्यासमोर प्रश्न आहे. गृहमंत्री अनिल देशमुख चालवतात की, शिवसेना नेते अनिल परब चालवतात? कारण ज्याप्रकारे सभागृहात गृहविभागाच्या मुद्द्यांवर गृहमंत्री अनिल देशमुखांऐवजी शिवसेना नेते अनिल परब बोलत होते. त्यामुळे या नियुक्त्यांमध्ये नेमकी भूमिका कोणाची हे स्पष्ट होणं गरजेचं आहे.", असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- गृह विभाग नेमकं कोण चालवतंय? अनिल देशमुख की अनिल परब? देवेंद्र फडणवीसांचा सवाल
- Sharad Pawar | गृहमंत्री अनिल देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय उद्यापर्यंत घेऊ : शरद पवार
- परमबीर सिंह यांचं पत्र आताच का? यासह 'या' मुद्यांमुळं पत्रावर प्रश्नचिन्ह
- उद्धवजी, शरद पवार आणि राष्ट्रवादी तुम्हाला संपवायला निघालेत : चंद्रकांत पाटील
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
