एमआयएम आणि भाजपचं वागणं बरं नव्हं : हसन मुश्रीफ
कोरोनाचा उद्रेक होईल अशी मागणी भाजपने करू नये, मंदिरे सुरू करायचीच आहेत. पण थोडा धीर धरावा, अशी विनंती हसन मुश्रीफ यांनी केली.
कोल्हापूर : कोरोनाच्या संकटात एमआयएम आणि भाजपचे हातात हात घालून काम सुरू आहे,असा आरोप ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापुरात केला. मंदिरे-मशिदी कोरोना संकट काळात सुरू करण्याची या दोन्ही पक्षाची मागणी योग्य नाही. मंदिरं-मशिद सुरू करायचेच आहेत. मात्र हात जोडून सांगतो थोडा धीर धरा,अशी विनंती हसन मुश्रीफ यांनी केली.
राज्यातील मंदिरे सुरू करण्याबाबत उद्या भाजप घंटानाद आंदोलन करणार आहे. त्यावर बोलताना मुश्रीफ म्हणाले, कोरोनाचा उद्रेक होईल अशी मागणी भाजपने करू नये, मंदिरे सुरू करायचीच आहेत. पण थोडा धीर धरावा. त्यापेक्षा भाजपने अलमट्टीची उंची वाढवण्याच्या विरोधात कर्नाटक सरकारशी चर्चा करावी. प्रसंग आल्यास आम्ही चंद्रकांत पाटील यांच्यासोबत आंदोलनाला कर्नाटकात जाऊ. पण संकट काळात अशी मागणी करणे योग्य नसल्याचं हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या दौऱ्यात दोन कामं करावी, एक अलमट्टीची उंची वाढवू देऊ नये, दुसरं मनगुत्ती गावात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यास कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांना विनंती करावी,असा टोला देखील मुश्रीफ यांनी लगावला.
उद्या विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. त्यावर बोलताना मुश्रीफ यांनी फडणवीस यांचे कोल्हापुरात स्वागत करतो. त्यांनी कोल्हापुरात येऊन प्रशासनाचे काम पहावे.ज्या उणिवा असतील त्याचा सूचना द्याव्यात.या निमित्तानं किमान आतापर्यंत बिळात बसलेले बाहेर पडतील असा टोला देखील मुश्रीफ यांनी भाजपच्या नेत्यांना लगावला.
Temples Reopen Issue | ... तर न्यायालयात जाऊ, नाशिकच्या काळाराम मंदिर विश्वस्तांचा इशारा