(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Exclusive : गृहपाठ बंद करण्याचा निर्णय मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देणारा : रणजितसिंह डिसले गुरुजी
राज्य सरकार विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणारा होमवर्क बंद करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी शिक्षकांना यासाठी प्रशिक्षित करणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया
मुंबई : राज्य सरकार विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणारा होमवर्क (HomeWork) आता बंद करण्याच्या विचारात आहे. या निर्णयाचे ग्लोबल पुरस्कार विजेते शिक्षक रणजितसिंह डिसले (Ranjitsinh Disale Guruji) यांनी स्वागत केले आहे. मुलांच्या पाठीवर असणारे ओझे कमी करत असताना अभ्यासाचे ओझे कमी करून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी असे निर्णय घेणे गरजेचे वाटते, अशी प्रतिक्रिया डिसले गुरुजींनी एबीपी माझाला दिली आहे.
डिसले गुरूजी म्हणाले, मुलांच्या पाठीवर असणारे ओझे कमी करत असतानाच अभ्यासाचे ओझे कमी करून मुलांच्या कल्पनाशक्तीला चालना देण्यासाठी असे निर्णय घेणे गरजेचे वाटते. याची अंमलबजावणी करण्यापूर्वी शिक्षकांना यासाठी प्रशिक्षित करणे गरजेचे आहे. अर्थात पालकांना हा निर्णय कितपत आवडेल याबाबत मला शंका आहे. मी सध्या अमेरिकेतील शाळांमध्ये जातोय, तिथे देखील मुलांना गृहपाठ दिले जात नाहीत. अर्थात असा निर्णय घेताना शिक्षक, पालक यांना विश्वासात घ्यावे लागेल.
राज्यात शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर विविध विभागांमध्ये महत्वाचे निर्णय घेतले जात आहेत. विद्यार्थ्यांना शाळेतून मिळणारा होमवर्क आता बंद होण्याची शक्यता आहे. लवकरच तज्ञांशी चर्चा करुन याबद्दल अंतिम निर्णय घेणार असल्याचे शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनी दिली आहे. राज्य सरकारकडून जर असा निर्णय घेण्यात आला तर घरी येऊन पुन्हा अभ्यास करण्याचा विद्यार्थ्यांवरचा ताण कमी होणार आहे. हा निर्णय घेण्यामागे विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जास्त वेळ मिळावा त्याद्वारे त्याच्या कलागुणांना वाव मिळावा हा हेतू आहे. तर गृहपाठ बंद करण्याचा निर्णय घेत असताना पालक शिक्षक संस्थाचालक या सगळ्यांना विचारात घेऊन हा निर्णय घ्यावा, असे मत नवी मुंबई पालक संघटनेचे अध्यक्ष सुनील चौधरी यांनी व्यक्त केले आहे