(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nashik Oxygen Leakage : नाशिकमधील दुर्घटनेतील मृतांचा आकडा 24 वर, ही आहेत मृत रुग्णांची नावं
Nashik Oxygen Leakage : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे.
नाशिक : नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. या ऑक्सिजन गळतीच्या घटनेत 24 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यभरात एकीकडे ऑक्सिजनचा तुटवडा असताना नाशिकच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयात ही अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ऑक्सिजनच्या टँकमध्ये अचानक गळती झाली. 13 KL क्षमतेचा हा ऑक्सिजन टँक होता. ऑक्सिजन टँकरमध्ये गळती झाल्याने तो सर्वत्र पसरला आहे. या गळतीनंतर ऑक्सिजन पुरवठा तब्बल अर्धा तास खंडित झाला होता.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये मदत जाहीर
या संपूर्ण घटनेत उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मी दिले आहेत असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले आहे. मृतांच्या वारसांना प्रत्येकी 5 लाख रुपये देण्याचे देखील त्यांनी जाहीर केले आहे. नाशिकची ही घटना सर्वांसाठी केवळ धक्कादायक नाही तर प्रशासनाला या संपूर्ण लढ्यात आपल्याला अतिशय काळजी घेऊन जावे लागणार आहे हे शिकविणारी आहे. आज गेल्या वर्षभरापासून आपण कोविडच्या लाटेला सामोरे जात आहोत. उपलब्ध डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी हे रात्रंदिवस रुग्णांचे जीव वाचविण्यासाठी झटताहेत, अशा परिस्थितीत अशा निष्काळजीपणाने जीव जाणे मनाला अतिशय बोचणारे आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणतात की , केवळ शोक सांत्वना करून चालणार नाही. अशा घटना भविष्यात घडू नये आरोग्य यंत्रणांचे मनोबल ज्यामुळे खच्ची होईल अशी कोणतीही घटना घडू नये यासाठी प्रशासनाने अतिशय काळजीपूर्वक आणि डोळ्यात तेल घालून काम केले पाहिजे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.
या रुग्णांचा मृत्यू
1.अमरदीप नगराळे
2. भारती निकम
3. श्रावण रा. पाटील
4. मोहना दे. खैरनार
5. मंशी सु. शहा
6. पंढरीनाथ दे. नेरकर
7.सुनिल झाळके
8.सलमा शेख
9.प्रमोद वालुकर
10.आशा शर्मा
11.भैय्या सय्य्द
12.प्रविण महाले
13.सुगंधाबाई थोरात
14.हरणाबाई त्रिभुवन
15.रजनी काळे
16.गिता वाघचौरे
17.बापुसाहेब घोटेकर
18.वत्सलाबाई सुर्यवंशी
19.नारायण इरनक
20.संदिप लोखंडे
21.बुधा गोतरणे
22.वैशाली राऊत
अशी घडली घटना
नाशिक महानगरपालिकेचे डॉ. झाकिर हुसेन हे 150 बेडचे कोविड रुग्णालय असून येथे आज सकाळी 10 वाजता 157 रुग्ण दाखल होते. त्यापैकी 131 रुग्ण ऑक्सिजनवर, 15 रुग्ण व्हेंटिलेटरवर व 61 रुग्ण क्रिटिकल होते. या रुग्णालयात ऑक्सिजन पुरवठयासाठी 13 KL चा लिक्विड ऑक्सिजन टॅंक Taiyo Nippon या कंपनीकडून भाडेतत्वावर घेण्यात आलेला आहे. उपरोक्त कंपनीकडून सदरचा टॅंक हा 10 वर्षाकरिता भाडेतत्वावर घेण्यात आलेला असून त्याची देखभाल दुरुस्ती व यामध्ये भरावयाचा लिक्विड ऑक्सिजन देण्याची जबाबदारीही कंपनीकडे आहे. आज दुपारी सुमारे 12.30 वाजता डॉ. झाकिर हुसेन रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांना ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे टॅंकची पाहणी केली असता, टॅंकच्या खालच्या बाजुला गळती आढळून आली. त्यामुळे टॅंकमधील ऑक्सिजन पातळी झपाट्याने कमी होत असल्याने रुग्णांस पुरेशा दबावाने ऑक्सिजन मिळत नसल्याचे दिसुन आले. सदरची बाब रुग्णालयातील डॉक्टर यांनी तात्काळ माझ्या निदर्शनास आणून दिली. सदरची बाब लक्षात येताच गळती दुरुस्तीसाठी शहरातील निखील गॅसचे मालक शेटे व पिनॅकल कंपनीचे इंजिनीयर यांना तातडीने घटनास्थळी बोलाविण्यात आले. फायर टेंडर मधून पाणी फवारणी करून ऑक्सिजन गळतीची जागा तज्ञांनी शोधली. सदर गळतीची पहाणी करुन गळती होणारा पाईपचा भाग दुरुस्त करुन पुन्हा जोडणी करण्यात आली. त्यानंतर रुग्णालयाचा ऑक्सिजनचा पुरवठा दुपारी सुमारे 1.45 ते 2 वाजता सुरळीत करण्यात आला. दरम्यानच्या काळात Taiyo Nippon या कंपनीचा लिक्वीड ऑक्सिजनचा टँकर दैनंदीन लिक्वीड ऑक्सिजन भरण्यासाठी स्थळावर आलेला होता व त्यामधून लिक्वीड ऑक्सिजन टँकमध्ये भरण्यात आले. या कालावधीमध्ये ऑक्सिजन पुरवठयाअभावी दुर्देवाने 22 रुग्णांचा मृत्यू झाला.