(Source: ECI/ABP News/ABP Majha)
गेल्या आठ महिन्यापासून बंद असलेल्या सर्कसीचे खेळ सुरू, विदूषकाच्या चेहऱ्यावर हास्य
मार्च महिन्यात सर्कशीचे खेळ सुरू होताच लॉकडाऊन लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान सर्कसीच्या मालकाचे झाले होते. सर्कसीतील कलाकारांना पगारपाणी नसल्याने 120 ते 130 कलाकारांचे जेवणांचे हाल झाले होते.
नवी मुंबई : मार्चमध्ये सर्कसीचा तंबू टाकून प्रत्यक्ष खेळ सुरू होणार तेवढ्यात कोरोनामुळे त्यावर पडदा पडला होता. गेल्या 10 महिन्यापासून एकाच जागी अडकलेल्या सर्कसीतील 120 कलाकारांना लॉकडाऊनमध्ये अतिशय हालाकीचे दिवस काढावे लागले. मात्र आता नविन वर्षात सर्कसीचा श्रीगणेशा झाला असून विदूषकाच्या चेहऱ्यावरील हास्याने लहान मुलांच्या आनंदालाही उधान आले आहे.
ऐरोली सेक्टर 10 मध्ये आलेल्या रेंम्बो सर्कसीला कोरोनामुळे चांगलाच फटका बसला होता. मार्च महिन्यात सर्कशीचे खेळ सुरू होताच लॉकडाऊन लागल्याने लाखो रूपयांचे नुकसान सर्कसीच्या मालकाचे झाले होते. सर्कसीतील कलाकारांना पगारपाणी नसल्याने 120 ते 130 कलाकारांचे जेवणांचे हाल झाले होते. स्वता:ला खायला नाही तर प्राण्यांना कुठून देणार अशी दयनीय अवस्थेत सर्कस आडकली होती.
याबाबत ABP माझाने बातमी दाखवल्यानंतर अनेकांनी पुढे येत सढळ हस्ते मदत करण्यास सुरुवात केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वता: दखल घेत शिवसैनिकांना आदेश देत लाॅकडाऊन संपेपर्यंत सर्कसीतील कलाकारांची सर्व जबाबदारी शिवसेनेने उचलली होती. नविन वर्षात सर्कसीच्या खेळाला सुरवात झाल्याने कलाकारांच्या चेहऱ्यावर रंग चढण्यास सुरवात झाली आहे. हरवलेले हास्य परत एकदा विदूषकाच्या चेहऱ्यावर उमटले आहे. बच्चे कंपनीच्या आनंदासाठी स्वता:चे दुख: विसरून नौटंक्या करणारा विदूषक पहायला मिळू लागला आहे.
लाॅकडाऊनमुळे घरात बंदीस्त असलेल्या मुलांच्या चेहऱ्यावरचे हास्य गायब झाले होते. अनेक मुलं घरात बसून अबोल झाली होती. पण सर्कसीतील विदूषकाला बघून खळखळून हास्याचे फवारे उडू लागले आहेत. तर दुसरीकडे आपल्या मुलांना मनमुराद हसताना बघून पालकांच्या चेहऱ्यावरही समाधानाची छटा उमटू लागली आहे.
Coronavirus Effect | कोरोना व्हायरसमुळे सर्कसमधील कलाकारांना फटका