Tanaji Sawant : माझ्याशी कुणी संपर्क करू नये, मला बोलायचं त्यावेळी बोलेन; तानाजी सावंतांकडून निवेदन, मंत्रिपद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक
Maharashtra Cabinet Expansion : तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो हा दिलेला शब्द एकनाथ शिंदेंनी पाळावा, तानाजी सावंत यांना आरोग्यमंत्री करा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
मुंबई : महायुतीच्या मंत्रिमंडळात माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची वर्णी न लागल्याने त्यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. तानाजी सावंत यांना आरोग्यमंत्री करा, त्यांना धाराशिवचे पालकमंत्री करा अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. तर या प्रकरणावर तानाजी सावंत सध्या काही बोलणार नाहीत, त्यांना बोलायचे असेल त्यावेळी सर्वांशी संपर्क साधला जाईल अशा आशयाचे निवेदन तानाजी सावंत यांच्या कार्यालयाकडून काढण्यात आलं आहे. माध्यमांसाठी हे निवेदन जारी करण्यात आलं आहे.
तानाजी सावंत यांना डावललं
देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये माजी आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांना डावलण्यात आले. त्यामुळे त्यांच्या समर्थकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. विधानसभा निवडणूक प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी तानाजी सावंत यांना 'तुम्ही आमदार करा, मी नामदार करतो' अशी घोषणा केली होती. आता शिंदे यांनी दिलेला शब्द पाळावा अशी मागणी त्यांच्य कार्यकर्त्यांनी केली आहे.
तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून डावल्यामुळे त्यांच्या समर्थकानी परांडा इथं आक्रमक होत घोषणाबाजी केली. तसेच एकनाथ शिंदे यांनी फेरविचार करत सावंत यांना पुन्हा आरोग्य मंत्री करावे अशी मागणी केली.
'धाराशिव जिल्ह्याचा पालकमंत्री कैसा हो, आमदार तानाजी सावंत जैसा हो', तानाजी सावंत आगे बढो, हम तुम्हारे साथ है अशा घोषण यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी केल्या.
काय म्हटलंय तानाजी सावंतांनी त्यांच्या निवेदनात?
सन्माननीय माजी आरोग्य मंत्री आणि परंड्याचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत साहेब हे नाराज असल्याच्या बातम्या आपल्या माध्यमातून वाचायला आणि पाहायला मिळत आहेत. त्यावरून सातत्याने सावंत साहेबांशी प्रतिक्रिया आणि बाईटसाठी विचारणा केली जात आहे. आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की, सावंत साहेबांना ज्यादिवशी या सगळ्याबाबत बोलायचे आहे, त्यादिवशी आपल्या सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क साधला जाईल. तोपर्यंत कृपया कुणीही बाईटसाठी पाठपुरावा करू नये, ही विनंती. आज संध्याकाळीही सावंत साहेब बाईटसाठी उपलब्ध नसतील, याची कृपया नोंद घ्यावी.
धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाने दिली हुलकावणी
देवेंद्र फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात धाराशिव जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिली आहे. शिंदे सरकारमधील शिवसेनेचे माजी मंत्री तानाजी सावंत यांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट झाला. तसेच माजी राज्यमंत्री आणि भाजप नेते राणाजगजीतसिंह पाटील यांना मंत्रिपदाची अपेक्षा होती. मात्र मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचाही नंबर लागला नाही. त्यामुळे धाराशिव जिल्हा मंत्रीपदापासून वंचित राहिला. शिंदे सरकारमध्ये माजी मंत्री तानाजी सावंत यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी होती. आता धाराशिव जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे जाणार याकडे लक्ष लागले आहे.
ही बातमी वाचा: