Sangli News: सांगली बँकेची सभा उधळून लावणार; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा इशारा
Sangli News : बड्या नेत्यांशी संबंधित असलेल्या संस्थाच्या कर्जाच्या व्याजमाफीच्या प्रस्तावाला स्वाभिमानी संघटनेने विरोध दर्शवला आहे.
Sangli Bank : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आज होणारी विशेष सर्वसाधारण सभा उधळून लावू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिला आहे. सांगली जिल्हा बँकेच्या कारभाराविरोधात बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येणार असल्याचेही स्वाभिमानी संघटनेने जाहीर केले आहे. सांगली जिल्हा बँकेकडून बड्या नेत्यांशी संबंधित संस्थांना कर्ज माफी देण्याचा प्रस्ताव येणार असल्याची चर्चा आहे. दरम्यान, आजच्या बैठकीतून राइट ऑफचा विषय वगळला असल्याची माहिती जिल्हा बँक अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली.
स्वाभिमानी आंदोलन करणार
बँकेच्या सभासदांनी नेत्याच्या कर्ज व व्याज माफी ठरावाला विरोध करावा, जे विरोध करणार नाहीत त्यांच्याही घरावर मोर्चे काढणार असल्याचा यावेळी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे यांनी दिला आहे. शनिवारी बँकेची सर्व साधारण सभा व संचालक बैठक बँकेच्या सांगली येथील मुख्य कार्यालयात होणार आहे. या पार्श्वभूमीवर शनिवारी सकाळी दहा वाजता पुष्प राज चौकातील मुख्य कार्यालयासमोर बोंबा बोंब आंदोलन करण्यात येणार आहे. या सभेत 76 कोटींचे कर्ज 'राईट ऑफ' करण्यात येणार असल्याचे म्हटले जात. यामध्ये सत्यजित देशमुख, विशाल पाटील यांच्या सहअन्य नेत्याच्या संस्था आहेत. तर 100 कोटींचे व्याज माफ करण्यात येणार आहे. यामध्ये डिव्हाईन फूड, विजयालक्ष्मी प्रोसे सिंग, रामानंद सूतगिरणी, राजाराम सूतगिरणी, सह्याद्री, स्वप्नपूर्ती या संस्था या राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, भाजपचे खासदार संजयकाका पाटील, विशाल पाटील, आमदार सुमनताई पाटील, राजेंद्र देशमुख आदीच्या संस्था आहेत.
नेत्यांना पायघड्या, शेतकऱ्यांसाठी दुसरा निर्णय
राईट ऑफ आणि व्याज माफी केल्यानंतर केन आग्रो, माणगंगा आणि महाकाली या तीन साखर कारखान्याचे कर्जाचे पुनर्घटन करण्यात येणार आहे. यामध्ये मूळ सर्व व्याज माफ करून पुढील बारा वर्षाचे हप्ते पाडून देण्यात येणार आहेत. अशा पद्धतीने नेत्यांना पायघड्या घातल्या जात आहेत. तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांना सहा टक्के व्याज माफी देण्यात आहे. ही व्याज माफीदेखील जे शेतकरी एक रक्कमी मुद्दल व व्याज भरणार आहेत, त्यांनाच हा लाभ मिळणार आहे. नेत्याच्या कर्जांना बारा वर्षे मुदत आणि शेतकऱ्यांनी मात्र एकाच वेळी भरले तरच लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांसोबत दुजाभाव का, असाही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. शेतकऱ्यांनाही मुदत द्या, त्याचेही सर्व कर्ज आणि व्याज माफ करा अशी स्वाभिमानीने मागणी केली आहे. बँकेचे असे दुहेरी धोरण चालू देणार नाही, बँकेच्या सभासदांनी याला विरोध करावा. आम्ही सभा ही होऊ देणार नाही, बँकेत घुसून सभा उधळून लावू असा इशाराही खराडे यांनी दिला आहे.
'राईट ऑफ' चा विषय वगळला
सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेने बड्या नेत्याच्या संस्थांचे थकीत कर्ज ‘राईट ऑफ' करण्याचा सर्वसाधारण सभेतील विषय अखेर वगळला आहे. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेने बचत गट, पतसंस्थासह १८९ संस्थांचे थकीत कर्ज ‘राईट ऑफ' करण्याचा घेतलेला निर्णय तात्पुर्ता स्थगित ठेवला आहे. नाबार्ड व सहकार खात्याकडे प्रस्ताव पाठवून त्यांच्या मान्यतेनंतरच याबाबत विचार केला जाणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष आमदार मानसिंगराव नाईक यांनी दिली. ओटीएस दिले तर त्या संस्थांना यापुढे कर्ज देणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
पाहा: Sangali District Bank Special Report: बॅंकेचा 'करेक्ट कार्यक्रम' कोण करतंय? ABP Majha
इतर महत्त्वाच्या बातम्या:
Sangli District Bank News : कुणाचंही व्याज माफ करण्याचा निर्णय घेतलेला नाही - मानसिंगराव नाईक