(Source: ECI/ABP News/ABP Majha)
काँग्रेस शहर अध्यक्ष अन् बावनकुळे यांच्यात देवाणघेवाण झाल्याचा सुषमा अंधारे यांचा आरोप; विकास ठाकरेंचा पलटवार, म्हणाले...
उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काँग्रेसचे आमदार विकास ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. आता त्यांच्या या आरोपांना विकास ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंवर पलटवार केला आहे.
नागपूर: शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी काँग्रेसचे आमदार आणि नागपूर शहर अध्यक्ष विकास ठाकरे (Vikas Thakre) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नागपूर ऑडी हिट अँड रन प्रकरणात (Nagpur Audi Car Accident) विकास ठाकरे आणि बावनकुळे यांच्यात देवाणघेवाण झाल्याचा आरोप केला आहे. विकास ठाकरे यांची काय मजबूरी आहे की जे संकेत बावनकुळे यांना वाचवत आहे? विकास ठाकरे यांच्याकडे पुरावे होते तर ते अपघातानंतर 36 तास गप्प का बसले? यात विकास ठाकरे यांचे काही स्थानिक राजकारण असू शकते, अशी शक्यता व्यक्त करत सुषमा अंधारे यांनी विकास ठाकरेंवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
गेल्या 10 वर्षात भाजप विरोधात आंदोलन करून माझ्यावर 40 केसेस- विकास ठाकरे
दरम्यान, आता या प्रकरणावर विकास ठाकरे यांनी प्रत्युत्तर देत सुषमा अंधारेंवर पलटवार केला आहे. नागपुरात मी 1984 पासून भाजप विरुद्ध लढत आहे आणि लोकांनी मला अनेकदा निवडून दिले आहे. गेल्या 10 वर्षात भाजप विरोधात आंदोलन करून 40 केसेस माझ्यावर आहे. भाजपशी कसं लढावं हे मला नागपुरात समजतं. याच्याबाबत कोणाकडून ज्ञान घेण्याची मला गरज वाटत नसल्याच्या टोला विकास ठाकरेंनी लगावला आहे. माझी भूमिका हीच आहे जो आरोपी असेल त्याला शिक्षा व्हावी. मी काही वेगळी भूमिका घेतली नाही. जो गुन्हेगार असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, अशी माझी भूमिका आहे. मात्र माझ्या बोलण्याचा कोणी विपर्यास केला असेल तर त्याचे उत्तर माझ्याजवळ नाही.
मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही
नागपुरात मी 1984 पासून भाजप विरुद्ध लढत आहे आणि लोकांनी मला अनेकदा निवडून दिले आहे. गेल्या 10 वर्षात भाजप विरोधात आंदोलन करून 40 केसेस माझ्यावर आहे. भाजपशी कसं लढावं हे मला नागपुरात समजतं. याच्याबाबत कोणाकडून ज्ञान घेण्याची मला गरज वाटत नाही. जर आरोपीला कोणी वाचवतील तर बाहेरच्या व्यक्ती पेक्षा हा विकास ठाकरे नागपुरात एकटा भारी आहे. मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. त्यांना इथे येऊन काय साध्य करायचे आहे, हे मला माहिती नाही. किंबहुना मी कोणाच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही. या प्रकरणात कुठलाच आरोपी वाचणार नाही. कोणाच्या खच्चीकरणाने कोणी खचत नाही. दहा वर्षात मी भाजपची सत्ता असताना त्यांच्या विरुद्ध लढून काँग्रेसची मतं वाढवली आहे. मला कोणाच्या सर्टिफिकेटची गरज नाही. मला या बाबत इलेक्ट्रॉनिक मीडियाने विचारायलेल्या प्रश्नावर आपले मत मांडल्याची स्पष्टोक्ती काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी बोलतांना व्यक्त केली आहे.
मी माझ्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना दुःखवत नाही
माझ्या मतदारसंघातील घटनेकडे मी दखल घेत असतो. मी मीडियासमोर स्वतःहून जात नसतो. प्रसिद्धीसाठी काही करत नाही, मीडियामध्ये बोलून फेमस व्हायची भूमिका माझी नसते. त्यामुळे सुषमा ताईंनी याच्यातून काही निष्पन्न केलं तर आम्हाला आनंदच होईल. जर चंद्रशेखर बावनकुळे वरती त्यांनी गुन्हा दाखल करून दाखवला, तर यापेक्षा जास्त आनंद आम्हाला काय होणार. कारण आमची लढाई त्यांच्याविरुद्ध आहे. त्यामुळे आमच्या त्यांना शुभेच्छा असून मी त्यांच्या पाठीशी असल्याचेही विकास ठाकरे म्हणाले. मला कुणाच्या आरोपाने काही फरक पडत नाही, मला जनता निवडून देते. मी माझ्याकडून महाविकास आघाडीच्या नेत्यांना दुःखवत नाही, याची दखल त्यांनी घ्यावी असेही विकास ठाकरे म्हणाले असून त्यांनी सुषमा अंधारे यांच्या टीकेवर भाष्य केलं आहे. ते नागपूर येथे बोलत होते.
हे ही वाचा