मोखाडा मधील आत्महत्या वेठबिगारीमुळे नाही : पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे
मोखाडा येथील बाळू धर्मा पवार यांनी केलेल्या आत्महत्येच्या अनुषंगाने त्यांच्या पत्नीने 20 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये वेठबिगारीला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते.
पालघर : पालघर जिल्ह्यातील मोखाडा मधील आसे गावात वेठबिगार असलेल्या इसमाने आत्महत्या केली. या प्रकरणात दाखल झालेल्या गुन्ह्याचा तपास कायदेशीर पद्धतीने केला जाणार असला तरीही जिल्ह्यात वेठबिगारी किंवा इतर अनिष्ट प्रकार नसल्याचे पालघरचे पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांनी म्हटले आहे.
मोखाडा येथील बाळू धर्मा पवार यांनी 13 जुलै रोजी केलेल्या आत्महत्येच्या अनुषंगाने त्यांच्या पत्नीने 20 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या तक्रारीमध्ये वेठबिगारीला कंटाळून आपल्या पतीने आत्महत्या केल्याचे नमूद केले होते. या विषयाची संवेदनशीलता पाहता पोलीस अधीक्षक तसेच जव्हारच्या उपविभागीय अधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आयुशी सिंह आणि तालुकास्तरीय अधिकाऱ्यानी सोमवारी आसे या दुर्गम गावाला भेट दिली. त्यांनी मृताची पत्नी, मुली, नातेवाईक, गावकरी, ग्रामसेवक, सरपंच व इतर संबंधितांची भेट घेऊन परिस्थिती जाणून घेतली.
सध्या भाताच्या आवणीचा काळ सुरू असून मोखाडा परिसरात मजुरांची मोठ्या प्रमाणात कमतरता जाणवत असल्याचे त्यांनी नमूद केले. जिल्ह्यात कुठेही वेठबिगार पद्धत नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. याउलट समूहाने आगामी काळात आपल्याकडे कामाला यावे. म्हणून शेतकरी ग्रामीण भागातील समूहांना शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीच भेटीगाठी घेऊन घेत असल्याची माहिती पाहणी दरम्यान पुढे आली आहे, असे त्यांनी सांगितले. वेठबिगारी किंवा कोणताही अनिष्ट प्रकार जिल्ह्यात सुरू असल्यास नागरिकानी जवळच्या पोलीस ठाण्यात, पोलीस नियंत्रण कक्ष, पालघर पोलिसांचे संकेतस्थळावर किंवा स्वतः पोलीस अधीक्षक यांना थेट संपर्क साधून तक्रार दाखल करण्याचे आवाहन केले. तर ज्या शेतावर काळू पवार ज्या मजुरांसोबत काम करायचा त्यांनीही ही आत्महत्त्या वेठबिगारीमुळे झाली नसल्याचे सांगितले आहे
आत्महत्या प्रकरणात आरोपी असलेल्या रामदास कोरडे यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला असला तरी या संपूर्ण प्रकाराचा कायदेशीर तपास करण्यात येईल, असे पोलीस अधीक्षक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बाळू पवार यांनी आत्महत्या केली त्या दिवशी (13 जुलै) खूप पाऊस सुरू असल्याने त्यांच्या गावातच दफनविधी केल्याची माहिती पोलीस अधीक्षक यांनी दिली. तसेच 2 ऑगस्ट रोजी या आत्महत्या विषयी मोखाडा पोलिसांना प्रथम माहिती प्राप्त झाली असता मृताच्या पत्नीने कोणत्याही प्रकारचा संशय व्यक्त केला नसल्याचे पोलीस अधीक्षक यांनी स्पष्ट केले. जिल्ह्यात कोणत्याही मजूर किंवा नागरिकांची अडवणूक किंवा पिळवणूक होत असल्यास त्यांनी पोलिसांकडे तक्रार करावी, असही आवाहन त्यांनी केले आहे.
मृताच्या या दोन्ही मुलींना आश्रम शाळेमध्ये चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळेल यासाठी जव्हारच्या आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी यांनी कार्यवाही सुरू केली असल्याचे पोलीस अधीक्षक यांनी सांगितले. आपल्या प्रत्यक्ष भेटीदरम्यान जिल्ह्यात कोणताही अनिष्ट प्रकार सुरू नसल्याचे त्यांनी सांगितले.
संबंधित बातम्या :