Sudhir Mungantiwar : रामदास कदमांच्या मागणीकडे भाजपचे दुर्लक्ष? 'ती' एकनाथ शिंदेंची अधिकृत भूमिका नसल्याचं मत
Sudhir Mungantiwar Reply To Ramdas kadam : रामदास कदमांनी व्यक्त केलेलं मत हे त्यांचं वैयक्तिक मत आहे, त्यामुळे त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य नसल्याचं भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मुंबई : लोकसभेच्या जागावाटपावेळी जे झालं ते घृणास्पद होते, आता विधानसभेसाठी 100 जागा द्या, अन्यथा सर्व जागांवर लढू असा थेट इशारा शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी भाजपला दिल्यानंतर आता त्याचे राजकीय पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे. रामदास कदम यांनी केलेलं वक्तव्य हे वैयक्तिक मत आहे, ती एकनाथ शिंदे यांची अधिकृत भूमिका नसल्याचं वक्तव्य भाजपचे नेते आणि राज्याचे मंत्री सुधीर मुनगंटीवर यांनी केलं आहे.
लोकसभा निवडणुकीवेळी भाजपने घेतलेल्या भूमिकेवर टीका करत रामदास कदम यांनी विधानसभेसाठी 100 जागांची मागणी केली आहे. ती मान्य न झाल्यास सर्व जागा लढवणार असा इशाराही त्यांनी भाजपला दिला. त्यावर आता भाजपकडून पहिली प्रतिक्रिया आली आहे.
काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार?
आमच्या समन्वय समितीच्या सदस्यांनी जर काही मत व्यक्त केलं तर त्यावर प्रतिक्रिया देणं योग्य राहील. रामदास कदमांनी व्यक्त केलेली भूमिका ही एकनाथ शिंदे अथवा शिवसेनेची नाही, ते वैयक्तिक मत आहे. महायुतीमध्ये कोणताही बेबनाव नाही. एकनाथ शिंदे वा अजित पवारांनी कुठेही अशा पद्धतीचं भाष्य केलं नाही. जर यावर काही चर्चा करायची असेल तर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार करतील किंवा तीनही पक्षाच्या समन्वय समितीकडून ही चर्चा केली जाईल.
रामदास कदमांनी विधानसभेच्या 100 जागांची मागणी केल्याच्या वक्तव्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, विधानसभेच्या जागावाटपावर तीनही पक्षाचे नेते चर्चा करतील. लोकसभेवेळी ज्या पद्धतीने जागावाटप झालं त्याच पद्धतीने विधानसभेवेळी होईल. विधानसभा जागावाटपाच्या वेळी कोणतीही अडचण येणार नाही.
लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपावेळी जे झालं ते घृणास्पद होतं असं वक्तव्य रामदास कदम यांनी केलं होतं. त्यावर बोलताना सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीवेळी आम्ही एकनाथ शिंदे यांना 15 जागा दिल्या होत्या. त्यामुळे कदम म्हणाले त्याप्रमाणे काहीही झालं नाही. तसं काही असतं तर एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांनी भाजपच्या नेत्यांशी चर्चा केली असती.
ही बातमी वाचा: