एक्स्प्लोर
पोलीस महासंचालकपदी सुबोधकुमार जायस्वाल तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे
राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदत वाढ देण्यास केंद्राने नकार दिला. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोधकुमार जायस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुंबई : राज्याच्या पोलीस महासंचालकपदी सुबोधकुमार जायस्वाल यांना बढती मिळाली आहे तर मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी संजय बर्वे यांची नियुक्ती झाली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त सुबोधकुमार जयस्वाल यांच्या हाती आता संपूर्ण राज्याची धुरा असणार आहे. राज्याचे पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर यांना मुदत वाढ देण्यास केंद्राने नकार दिला. राज्याचे पोलीस महासंचालक म्हणून सुबोधकुमार जायस्वाल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रॉ सारख्या भारताच्या केंद्रीय सुरक्षा संस्थेमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना आहे. सुबोधकुमार जायस्वाल हे 1985 च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. ते केंद्रीय गुप्तचर यंत्रणा रॉ मध्ये उच्चपदावर काम प्रतिनियुक्तीवर काम करत होते. राज्य सरकारने 2018 मध्ये त्यांना पुन्हा राज्याच्या सेवेत घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी केंद्रानेही त्याला मंजूरी दिली. त्यानंतर त्यांची नियुक्ती मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आली होती. तत्पुर्वी ते एटीएसचे डीआयजी म्हणूनही कार्यरत होते. त्यांनी 2006 मध्ये झालेल्या मालेगाव बॉम्बस्फोटाचा तपासही केला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची मुंबई पोलीस आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर, पोलीस महासंचालक दत्ता पडसलगीकर सेवानिवृत्त होत असल्यामुळे त्यांच्या जागी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांची वर्णी लागली आहे. देशात तणावाचे वातावरण असताना महासंचालक व मुंबई पोलीस आयुक्त पदासारखी महत्त्वाची पदे रिक्त ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य नसल्यामुळे आज तात्काळ ही पदे भरण्यात आली आहेत. मुंबईचे आयुक्त सुबोध जयस्वाल हे महासंचालक पदाची धुरा सांभाळणार हे निश्चित झाले होते. त्यामुळे त्यांच्या जागी कोणाची नियुक्ती होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अप्पर महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) परमबीर सिंह व लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांची नावं आघाडीवर होती.
आणखी वाचा






















