पुणे-बंगळुरू महामार्गावर विचित्र अपघात; डिव्हायडर फोडून कंटेनर ट्रकवर आदळला, दोन्ही ड्रायव्हरचे पाय तुटले
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवरून दुसऱ्या बाजूला कंटेनर जाऊन भीषण अपघात झाला.
बेळगाव : राज्यात रस्ते विस्तारीकरणाचे काम गेल्या काही वर्षात मोठ्या प्रमाणात झाले असून रस्त्यांचे जाळे वाढले आहे. साहजिक वाहनांची संख्याही दरवर्षी वाढत असून अपघाताचे प्रमाणही वाढल्याचं आकडेवारीवरुन दिसून येत आहे. राज्य किंवा राष्ट्रीय महामार्गावर जड वाहनांच्या अपघाताचे (Accident) मूळ कारण हे वाहनाचा वेग आणि ओव्हरटेक करणे हेच असल्याचेही समोर आले आहे. बेळगाव जिल्ह्यात पुणे-बंगळुरू महामार्गावर नुकतेच एका कंटनेर वाहनाचा भीषण आणि विचित्र अपघात झाला आहे. या भीषण दुर्घटनेत कंटेनरचालक आणि ट्रकमधील ड्रायव्हर (Driver) यांना गंभीर दुखापत झाली असून दोघांचेही पाय तुटल्याची प्राथमिक माहिती आहे.
पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनर चालकाचे नियंत्रण सुटल्याने डिव्हायडरवरून दुसऱ्या बाजूला कंटेनर जाऊन भीषण अपघात झाला. डिव्हायडरच्या बाजुला असलेल्या ट्रकला कंटेनरची धडक बसून दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर हलगा गावाजवळ हा विचित्र अपघात घडला. कंटेनरच्या धडकेने ट्रकच्या केबिनचा चेंदामेंदा झाला असून दोन्ही वाहनांचे चालक गंभीर जखमी झाले आहेत. अपघात झाल्यावर दोन्ही वाहनांचे चालक जखमी अवस्थेत वाहनात अडकून पडले होते. यावेळी, त्यांना बाहेर काढण्यासाठी स्थानिकांनी पोलिसांना मदत केली. रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकमधे दोन जण प्रवासी होते, ते देखील किरकोळ जखमी झाले आहेत. या भीषण अपघातात दोन्ही चालकांचे पाय तुटल्याची माहिती आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस व प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने दोन्ही वाहन चालकांना गाडीतून बाहेर काढले. त्यानंतर, उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. हिरे बागेवाडी पोलीस स्थानकात या विचित्र अपघाताची नोंद झाली आहे.
हेही वाचा
''गुजरातच्या बसला आम्ही पार्कींगची जागा देऊ, पण टीम इंडियाला मुंबईच्या 'बेस्ट' बस मधूनच फिरवा''
हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम