हाथरस दुर्घटनेनंतर जाग, आषाढीच्या पार्श्वभूमीवर पंढरीत कारवाई; प्रशासनाची अतिक्रमण हटाव मोहीम
आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नोटीस न देता अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत.
सोलापूर : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे भोलेबाबा यांच्या सत्संगावेळी चेंगराचेंगरी झाली. त्यामध्ये 121 जणांचा बळी गेला. दुर्घटनेनंतरची दृश्य ही मन विषण्ण करणारी होती. देवाचा धावा करण्यासाठी आलेले भाविक दुर्दैवी घटनेमुळे देवाघरी गेल्याची संतापजनक घटना घडली. जागेच्या क्षमतेपेक्षा जास्त प्रमाणात गर्दी झाल्याने ही घटना घडल्याने, आता पंढरीच्या वारीपूर्वीच (Pandharichi wari) प्रशासनाने सावधगिरी बाळगली आहे. हाथरस दुर्घटनेतून धडा घेत पंढरीत प्रशासनाने अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात केली आहे. आषाढी (Ashadhi) वारीच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेत येथील परिसर विस्तीर्ण करण्यासाठी प्रशासन पाऊलं उचलत आहे. मात्र, या कारवाईवर व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे.
आषाढीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने नोटीस न देता अतिक्रमण हटाव मोहीम सुरु केल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील चेंगराचेंगरीची दुर्घटनेनंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून आषाढीच्या पार्श्वभूमीवर गर्दीच्या ठिकाणी असणारी अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली आहे . नगरपालिकेने आज पोलीस प्रशासनासह प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. मात्र, व्यापाऱ्यांना कोणतीही नोटीस न देता अतिक्रमण केल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. नगरपालिका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आज या अतिक्रमण हटाव मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी प्रांताधिकारी, डीवायएसपी, नगरपालिका मुखयधिकारी यांचेसह 100 पेक्षा जास्त कर्मचारी, जेसीबी आणि टेम्पोसह रस्त्यावर उतरल्याचं दिसून आलं.
या मार्गावरील व्यापाऱ्यांनी पाऊस आत येऊ नये यासाठी लावलेल्या पाणसळ तोडून टाकण्यास सुरुवात केल्याने व्यापारी आक्रमक झाले. यातच पाणसळ तोडताना व्यापाऱ्यांची लोखंडी शटर देखील उचकटून आल्याने या गोरगरीब व्यापाऱ्यांना हजारो रुपयाचा भुर्दंड बसला आहे. एकाबाजूला शहरात प्रत्येक प्रमुख मार्गावर राजकीय आशीर्वादाने शेकडो खोके, टपऱ्या आणि कार्यालये सुरु असताना यावर कारवाईचे धाडस मात्र प्रशासन दाखवत नसून गोरगरीब व्यापाऱ्यांच्या दुकानावरील पत्रे तोडत असल्याने व्यापारी संतप्त झाले आहेत. प्रशासनाने आम्हाला नोटीस दिल्या असत्या तर आम्ही स्वतः दुकानावर निवाऱ्यासाठी लावलेली पाणसळ हटविल्या असत्या, अशी संतप्त भूमिका व्यापाऱ्यांनी घेतली.
बेकायदा अतिक्रणवरही कारवाई करावी
दरम्यान, बेकायदा टपऱ्या आणि खोक्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देणे टाळत प्रशासनानेही ही मोहीम सुरु ठेवली आहे. आता ज्या पद्धतीने शहरातील व्यापाऱ्यांवर अतिक्रमणाची कारवाई झाली, तशी राजकीय आशीर्वादाने शहरात असणाऱ्या बेकायदा अतिक्रमित इमारती, खोके आणि टपऱ्या हटविण्याची मागणी व्यापाऱ्यांची आहे .
हाथरसमध्ये नेमका कसा घडला अपघात
सिकंदराबादच्या फुलरई गावात भोलेबाबा नावाच्या महाराजाचा सत्संग आयोजित केला होता. आणि याच सत्संगानंतर, या बाबाच्या पायाखालची माती घेण्यासाठी जत्थेच्या जत्थे धावले आणि मोठी दुर्घटना घडली. सत्संगासाठी 80 हजार जणांची परवानगी असतानाही त्या दिवशी 2.50 लाख भाविक जमले होते. सत्संग संपल्यावर भोलेबाबाची चरणधूळ गोळा करण्यासाठी पळापळ झाली. चरणधुळीसाठी अनेक जण बसलेल्यांच्या अंगावरून धावत गेले. यामुळे अनेक जण खाली पडले, त्यांच्या अंगावरून लोक जात राहिले. काही क्षणांत या पळापळीचं चेंगराचेंगरीत रुपांतर झालं. पुढच्या बाजूनं सत्संग समितीचे लोक भाविकांना रोखत होते. त्यामुळे मागे गर्दी वाढली आणि चेंगराचेंगरीची तीव्रता आणखी वाढली. या दुर्देवी घटनेमध्ये जीव गुदमरून 121 जणांचा मृत्यू झाला, यामध्ये 100 पेक्षा जास्त महिलांचा समावेश आहे. अनेकजण यामध्ये जखमीही झाले.