एक्स्प्लोर
Advertisement
वड पाच्ची रिटर्न्स! लॉकडाऊनमध्ये दारुड्यांचा धुमाकूळ सुरुच, वाईन शॉप्स फोडण्यासह नवनव्या क्लुप्त्या
कोरोनामुळं केलेल्या लॉकडाऊनमध्ये दारुचं व्यसन असणाऱ्यांना आपली तलफ कशी भागवायची हा प्रश्न आहे.राज्यात काही ठिकाणी मद्यपींकडून दारुची दुकानं फोडल्याचे प्रकार समोर आले आहेत.
मुंबई : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने राज्यात लॉकडाऊन घोषित केला आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहतील असे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे तळीरामांची मात्र मोठी गैरसोय होताना दिसतेय. मात्र संचारबंदीचा फायदा उचलत काही तळीरामांनी चक्क दारूच्या दुकानावरच डल्ला मारला आहे. दारुड्यांनी आपली तलफ भागवण्यासाठी अनेक ठिकाणी दारुची दुकानचं फोडली आहेत. यातील काही घटना सीसीटीव्हीत देखील कैद झाल्या आहेत. या घटना थांबण्याचं नावच घेत नाहीयेत. एकीकडे पोलिस प्रशासन संचारबंदीसाठी संपूर्ण ताकत लावून उभे असताना दुसरीकडे दारुड्यांच्या वाढत्या उपद्रवाने नवे आव्हान उभे राहिले आहे.
नागपुरात तळीरामांच्या संयमाचा बांध सुटला
लॉकडाऊनमुळे मद्यविक्रीची दुकाने बंद असल्याने नागपुरात तळीरामांच्या संयमाचा बांध वारंवार सुटताना दिसतोय. त्यामुळंच नागपुरात 6 दिवसात पाच वेगवेगळे बार आणि दारूची दुकान फोडल्याच्या घटना घडल्या आहेत. काल शनिवारी रात्री 2 बियरबार फोडून चोरट्यांनी हजारो रुपयांची दारू चोरून नेली. विशेष म्हणजे दोन्ही घटनांमध्ये हे तळीराम चोरटे दारूची चोरी करताना बारमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले. पहिली घटना जरीपटका पोलीस स्टेशनच्या हद्दीत आतिष बार अँड रेस्टॉरंटमध्ये घडली. इथे तीन चोरटे बारमध्ये शिरून मोठ्या संख्येने दारूच्या बाटल्या चोरताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले. विशेष म्हणजे या चोरट्यांनी बार मधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर चोरण्याचा प्रयत्नही केला. दारू चोरीची दुसरी घटना गड्डीगोदाम येथील काश्मीर बारमध्ये घडली. या ठिकाणी चोरट्याने काही रोख रक्कम व दारूच्या अनेक बाटल्या चोरून नेल्या. लॉकडाऊनमध्ये यापूर्वीही नागपुरात दारू चोरीच्या अनेक घटना घडल्या आहेत. 31 मार्चच्या पहाटे नागपुरातील सदर परिसरात सुविधा बार मध्ये दारू चोरीची घटना घडली होती, तिथे दोन चोरट्यानी एक लाखांची ब्रॅण्डेड दारू चोरली होती. तर 1 एप्रिलच्या पहाटे खरबी परिसरात आनंद बार एन्ड रेस्टोरेन्ट मध्ये चोरट्यानी भिंत पाडून दारू चोरून नेली होती. तर 2 एप्रिल रोजी मौद्यात देशी दारू दुकानात चोरीचे प्रकरण घडले होते. त्यामुळे गेल्या 6 दिवसात नागपुरात बार आणि दारू दुकानातून महागडी दारू चोरून नेल्याच्या 5 घटना घडल्या आहेत. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये मद्यविक्री बंद असल्याने तळीराम बैचेन झाल्याचे आणि ते दारू चोरीच्या घटना घडवत असल्याचे दिसून येत आहे.
ठाण्यात चढ्या भावाने छुप्या पद्धतीने मद्याची विक्री
अनेक दिवसांपासून मद्यविक्री बार, रेस्टॉरंट बंद आहे. त्यामुळे मद्यपींचा जीव कासावीस होत असणार यात शंका नाही. अशात विदेशी मद्याच्या बाटल्या बाळगणाऱ्या सचिन नऱ्हे या ठाण्यातील रुणवाल प्लाझा इथे राहणाऱ्या तरुणाविरोधात वर्तकनगर पोलिसांनी सरकारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दुसरीकडे छुप्या पद्धतीने, दुप्पट पैसे आकारून काही जण मद्य विक्री करत असल्याचे देखील समोर आल्याने पोलीस बारकाईने लक्ष ठेऊन आहेत. देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे मद्यविक्रीसह मद्य जवळ बाळगण्याबाबत मनाई आदेश जारी करण्यात आले आहेत. त्यामुळे,अनेकजण वाटेल ती किंमत मोजून मद्य खरेदी करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाल्याने सदरची कारवाई करण्यात आली.या तरुणाच्या आलिशान गाडीमध्ये तसेच,घरात विदेशी मद्याच्या बाटल्या आढळल्याने वर्तकनगर पोलिसांनी मद्य जप्त करून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला.
हिंगोलीत गावठी हातभट्टीवर पोलिसांचा छापा
सध्या लॉकडाऊनमुळे वाईन शॉप, देशी, विदेशी दारूची सर्व दुकाने बंद करण्यात आली आहेत. त्यामुळे काही तळीराम घरगुती दारू तयार करून त्या दारूची विक्री करीत आहेत. हिंगोलीमधल्या औंढा तालुक्यातील हट्टा पोलीस स्टेशनमध्ये येत असलेल्या जवळा बाजार येथे गावठी हात भट्टीवर पोलिसांनी छापा मारून 1200 लिटर हातभट्टीचे रसायन नष्ट करून 38 लिटर हात भट्टीची दारू जप्त केली. ही दारू मोह, इतर साहित्य वापर करून तयार केली जात होती. एकूण अठरा आरोपींविरुद्ध हट्टा पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.
अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली दारुची वाहतूक
कोरोनामुळे देशात लॉकडाऊन केल्यानंतर राज्याच्या सीमा ही बंद करण्यात आल्या. त्यानंतर जिल्हांतर्गत सीमा ही बंद करण्यात आल्या. असं असताना देखील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली कणकवली खारेपाटण तपासणी नाक्यावर गोवा बनावटीची दारू अत्यावश्यक सेवेच्या ट्रकमधून वाहतूक केली जात होती. गोव्याहून कोलाड (रायगड) च्या दिशेने हा ट्रक जात होता. या ट्रकच्या हौद्यात दारूचे 18 बॉक्स होते. सुमारे 75 हजार 600 रुपयांच्या दारुसाठा होता. तो खारेपाटण पोलीसांनी जप्त केला. ट्रकचालक अजितकुमार सिंग सह ट्रक सुध्दा ताब्यात घेण्यात आला आहे. गोवा, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा या दोन्ही सीमा बंद केल्या असताना देखील खारेपाटणपर्यंत दारू वाहतूक झाली कशी?. अत्यावश्यक सेवेच्या नावाखाली गोवा बनावटीची दारु सिंधुदुर्गातही मोठ्या प्रमाणावर आणली जात आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यांच्या सीमा बंद करुन देखील दारु व्यावसायिक वेगवेगवेगळ्या शक्कल लढवित दारु वाहतुक करत आहेत.
गावकऱ्यांनी पकडली दारु
तळकोकणातील दोडामार्ग तालुक्यात लॉकडाऊन काळात बेकायदा दारू आणल्याप्रकरणी दोडामार्ग पोलिसांनी कोल्हापूर येथील तिघांना ताब्यात घेतले व कारसह तब्बल 3 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई दोडामार्ग मधील कुंब्रल ग्रामस्थांच्या मदतीने दोडामार्ग चंदगड रस्त्यावर करण्यात आली. जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद केलेल्या असताना रात्रीच्या वेळी दोडामार्ग कुंब्रल मार्गे चंदगडला बेकायदेशीर गोवा बनावटीची दारू वाहतूक करणारी कार ग्रामस्थानी कुंब्रल येथे अडवून पोलिसांच्या स्वाधीन केली. गेले अनेक दिवसांपासून दोडामार्ग मार्गे कुंब्रल ते केर भेकुर्ली मार्गे चंदगडच्या दिशेने गोवा बनावटीची दारू बेकायदेशीर वाहतूक केली जात होती.
तळीरामांना दारु पुरवण्यासाठी सोशल मीडियाचा आधार
तळीरामांना दारु पुरवण्यासाठी विरारमध्ये चक्क सोशल मीडियाचा आधार घेण्यात आला. इंस्टाग्राम सोशल नेटवर्कवर "द लिकर मॅन" या अकाऊंट द्वारे हा ग्रुप चढ्या दराने दारू विक्री करत होता. बियर विस्की, स्कॉच अशा दारुची फोटो टाकून त्याचे रेटही लिहून ठेवले होते. कुणाला पाहिजे असेल तर फोन नंबर दिला होता. याची माहिती विरार पोलिसांना मिळताच त्यांनी सापळा रचून दारु विकत घेण्याच्या बहाण्याने या टोळीचा भांडाफोड केला.
दारू दुकानं चालू करायचं उद्धव ठाकरेंना सांगा, वृद्धाची आमदारांकडे मागणी
परभणीतील जिंतूर येथील बाजारामध्ये गर्दी झाल्यामुळे स्वतः जिंतूरच्या आमदार मेघना बोर्डीकर या रस्त्यावर उतरून लोकांना घरी बसण्याचे आवाहन करत होत्या. त्यावेळी एका वृद्धाने चक्क मेघना बोर्डीकर यांना दारूचे दुकान चालू करा, उद्धव ठाकरेंना सांगा आम्ही काय करायचे अशी मागणी केल्याने सर्वजण अवाक् झाले. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय.
व्यसनी लोकं घेताहेत समुपदेशन
लॉकडाऊनच्या या कालावधीत दारु आणि सिगारेट मिळत नसल्याने या गोष्टीचं व्यसन असलेले अस्वस्थ झालेत. त्यामुळं अशा लोकांकडून समुपदेशनासाठी फोन करण्याचं प्रमाण लॉकडाऊनच्या कालावधीत वाढल्याच पुण्यातील मुक्तांगन व्यसनमुक्ती केंद्राच्या प्रमुख डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे. कुठल्याही व्यसनाच्या शारिरीक गुलामगिरीतून बाहेर येण्यासाठी चार दिवसांचा कालावधी पुरेसा ठरतो. लॉकडाऊनच्या या कालावधीचा उपयोग शारिरीक आणि मानसिक अशा दोन्ही प्रकारच्या गुलामगिरीतून सुटण्यासाठी करुन घेता येऊ शकतो असं डॉक्टर मुक्ता पुणतांबेकर यांनी म्हटलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सांगली
निवडणूक
Advertisement