ST Workers Strike : 'कारणे दाखवा नोटीस' बजावल्याने एसटी कर्मचाऱ्याची आत्महत्या
St Workers Strike : नांदेडमध्ये आणखी एका एसटी कर्मचाऱ्याने आत्महत्या केली असल्याचे समोर आले आहे.
ST Workers Strike Updates : मागील अडीच महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी महामंडळाने वेतनवाढ व इतर मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद दिल्यानंतरही विलनीकरणाच्या मागणी एसटी कर्मचारी ठाम आहेत. वारंवार आवाहन करूनदेखीलही कामावर रुजू न झालेल्या कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अनेक एसटी कर्मचाऱ्यांना एसटी महामंडळाने कारणे दाखवा नोटीस बजावण्यास सुरुवात केली आहे. नांदेडमध्ये कारणे दाखवा नोटीस मिळालेल्या एका कर्मचाऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली असल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संभाजी गुट्टे असे या एसटी कर्मचाऱ्याचे नाव आहे.
गेल्या अडीच महिन्यापासून एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण करण्यासाठी आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक व मानसिक स्थितीही ढासळली असल्याचे म्हटले जात आहे. संपावर तोडगा निघत असल्याने आणि एसटी महामंडळाकडून सुरू असलेल्या कारवाईच्या कैचीत एसटी कर्मचारी अडकले आहेत. यातून आतापर्यंत नांदेड जिल्ह्यात चार एसटी कर्मचाऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे.
आज नांदेड जिल्ह्यातील कंधार आगारातील वाहक संभाजी गुट्टे यांनी विष प्राशन करून आत्महत्या केली. आगार प्रमुख एस. एम. ठाकूर यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटिसच्या भीती पोटी व आगार प्रमुखांच्या कामावर रुजू व्हावे यासाठी लावलेल्या तगाद्यामुळे त्यांनी विष प्राशन केले असल्याचे म्हटले जात आहे. एसटी वाहक संभाजी गुट्टे यांचा एक व्हिडिओदेखील व्हायरल झाला आहे. सदर कर्मचारी मी आगार प्रमुखांच्या दबावामुळे आत्महत्या करणार असल्याचे इशारा देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्याशिवाय त्यांनी कंधार आगार प्रमुखांविरोधात केलेली तक्रार देखील सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. नांदेड जिल्ह्यात एकाच महिन्यात चार एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या करून मृत्यूला कवटाळल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये शोक संतप्त भावना आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एसटी आंदोलन चिघळण्याची चिन्हं आहेत.