ST strike : अॅड. सदावर्तेंसह तीन आरोपींचा जामीन फेटाळला, गिरगाव न्यायालयाचा निकाल
Sharad Pawar : या हल्ल्यामध्ये आपला काही संबंध नसून अॅड. सदावर्तेंचा हात असल्याचं अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी न्यायालयात सांगितलं आहे.
मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक या घरावर केलेल्या हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासह इतर चार आरोपींचा जामीन फेटाळला आहे. यामध्ये सचितानंद पुरी, राम कातकडे, संकेत नेहरकर आणि रमेश गोरे यांचा समावेश आहे. या हल्ल्याप्रकरणातील सर्व म्हणजे 115 आरोपी सोमवारी सत्र न्यायालयात जामीनासाठी अर्ज करणार असल्याची माहिती आहे.
दरम्यान, आरोपी संदीप गोडबोले आणि अजित मगरे यांना 19 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. या चार आरोपींपैकी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी या हल्ल्यामध्ये सदावर्तेंचा हात असल्याचं कबुल केलं आहे.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद करताना म्हटलं की, "अभिषेक पाटील आणि चंद्राकांत सूर्यवंशी यांचा तपास पूर्ण झाला असून मगरे याला आजच अटक केली आहे. तसेच या हल्ल्यामध्ये संदीप गोडबोले यांचा मेजर रोल आहे. या हल्ल्यासाठी स्पेशली हा माणूस नागपूरहून मुंबईला आला असून 7 एप्रिलच्या बैठकीत हा हजर होता. सोबतच इतरही लोकं हजर होते. त्यात जयश्री पाटील या देखील होत्या. सध्या सीसीटीव्हीचं ॲनॅसिसिस केलं जातंय. संदीप गोडबोले आपला मोबाइल देत नाही. त्यासंबंधी अधिक तपास करायचा आहे. नागपूरला त्याला पुन्हा घेऊन जावं लागेल आणि त्यामुळे त्याची कोठडी हवीय. हा तपास झाल्यानंतर सदावर्ते यांची देखील कोठडी आम्हाला लागेल यात शंका नाही."
ॲफिडेव्हिट फाईल करायचं आहे म्हणून सदावर्ते यांनी कर्मचाऱ्यांकडून 270 रुपये उकळण्यात आल्याचं प्रदीप घरत यांनी न्यायालयात सांगितलं. ते म्हणाले की, "पैसा उकळण्यासाठी सदावर्ते यांच्याकडून एक फॉर्म तयार करण्यात आला होता. तो व्हॉट्सॲपवर फिरवण्यात आला. 250 डेपोतून हे पैसे गोळा करण्यात आलेत. प्रॉपर्टी आणि कार सदावर्ते यांनी याच पैशातून खरेदी केल्याचा आम्हाला संशय आहे. अजित मगरे याने या षडयंत्रातदेखील ॲक्टिव्ह रोल यात प्ले केला. त्यामुळे त्याची देखील कोठडी हवीय. तसेच गोडबोले यात सहभागी आहे. त्यामुळे त्याच्या अधिक चौकशीसाठी त्याला नागपूरला न्यावे लागेल."
..सगळं सदावर्तेंनी केलंय
या प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपल्याला न्यायाधीशांशी बोलायचं आहे अशी विनंती केली होती, आम्हाला न्यायालयाला (म्हणजेच न्यायाधीशांना) काही सांगायचे आहे असं ते म्हणत होते. या प्रकरणात आमचा काही रोल नाही. आम्ही आरोपी नाही, सगळं सदावर्ते यांनी केलंय असं अभिषेक पाटील म्हणाला. तर तशाच प्रकारची कबुली चंद्रकांत सुर्यवंशी यांने दिली आहे.
सदावर्ते यांच्या वकिलांचा युक्तीवाद
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावतीनं अॅड. गिरीश कुलकर्णी यांनी युक्तीवाद केला. त् म्हणाले की, आम्ही काय खंडणी मागितली नव्हती, हा आरोप चुकीचा आहे. मागील तीन दिवसापासून सांगतायंत की सदावर्ते यांनी पैसे गोळा केलेत. पैसे खर्च केलेत किंवा नाही केलेत त्याचा अजूनही पत्ता नाही. फॅक्ट हे आहे की ही लोकं पाच महिने मैदानावर राहिलेत. पैशांसंदर्भात काही करार झाला नव्हता. समजा हा पैसा फी साठी घेतला. त्यांनी मला फी बद्दल विचारलं नाही. पैसा दाखवला नाही असा म्हणतायत हे चुकीचं आहे. 403 आणि 406 कलम यात लागूच होत नाही. कोणाचं ब्रीच ऑफ ट्रस्ट झालं नाही आहे. कोणता पैसा कुठे गेला कसा गेला यासंबंधी चौकशी करायचा प्रश्न येतोच कुठे. माझ्या क्लायन्टनं पैसे मला दिले त्याची चौकशी करणं चुकीचं आहे. 80 लाख गोळा केले असं म्हणतायत, ती माझी फी होती.
महत्त्वाच्या बातम्या :