ST strike : हल्ल्यामध्ये आमचा काही रोल नाही, सर्व काही सदावर्तेंनी केलं; दोन आरोपींची न्यायालयात कबुली
शरद पवारांच्या घरावर हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या दोन आरोपींनी या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्तेंकडे बोट दाखवलं आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या मुंबईतील घरावरील हल्ल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चार आरोपींपैकी दोन आरोपींनी या प्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्तेंकडे बोट दाखवलं आहे. या हल्ल्यामध्ये आपली काही भूमिका नसून सर्व काही केलं ते सदावर्तेंनी केलं अशी कबुली आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सुर्यवंशी यांनी दिली आहे.
या प्रकरणातील आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांनी आपल्याला न्यायाधीशांशी बोलायचं आहे अशी विनंती केली होती, आम्हाला न्यायालयाला (म्हणजेच न्यायाधीशांना) काही सांगायचे आहे असं ते म्हणत होते. या प्रकरणात आमचा काही रोल नाही. आम्ही आरोपी नाही, सगळं सदावर्ते यांनी केलंय असं अभिषेक पाटील म्हणाला. तर तशाच प्रकारची कबुली चंद्रकांत सुर्यवंशी यांने दिली आहे.
दरम्यान, शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागलं आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती समोर आली आहे. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकवण्यात आलं होतं. त्यानंतर अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाकडे मोर्चा वळवला. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्यांना अटक केली होती. या आंदोलनाप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या: