(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ST च्या विलिनीकरणाची बैठक, गुणरत्न सदावर्ते बायको आणि मुलीसह हजर, कारणही सांगितलं
एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
मुंबई : विलीनीकरणाबाबत सरकार सकारात्मक वाटत असल्याचे अॅड. गुणवर्ते सदावर्ते यांनी म्हटले. विलीनीकरणाबाबत परिवहन मंत्री अनिल परब महाधिवक्त्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती अॅड. सदावर्ते यांनी दिली. मागील दोन आठवड्यांपासून सुरू असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर तोडगा काढण्यासाठी एसटी महामंडळ आणि सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. एसटी संपावर मार्ग काढण्यासाठी मुंबई सेंट्रल येथील महामंडळाच्या मुख्यालयात परिवहन मंत्री अनिल परब यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली.
या बैठकीला महाराष्ट्र राज्य कनिष्ठ श्रेणी एसटी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजय गुजर, कर्मचारी संघटनेच्यावतीने हायकोर्टात बाजू मांडणारे अॅड. गुणरत्न सदावर्ते, त्यांची मुलगी झेन सदावर्ते आणि त्यांच्या पत्नी हे देखील उपस्थित होते. ST विलिनीकरणाबाबत सरकार सकारात्मक असून जे पवारांना जमलं नाही, ते परबांना करण्याची संधी असल्याचे देखील ते या वेळी म्हणाले.
कोण आहे झेन सदावर्ते?
हिंदमाता परिसरात क्रिस्टल टॉवर 2018 साली मुंबई येथील इमारतीला आग लागली. या आगीतून झेन सदावर्ते यांनी प्रसंगावधान दाखवत तब्बल 17 जणांचा जीव वाचवला. या धाडसामुळे झेन जोरदार चर्चेत आली होती. तिच्या धाडसाचे कौतुक केले. या कामगिरीसाठी झेनला राष्ट्रीय पुरस्काराने देखील गौरविण्यात आले. झेन सदावर्ते ही मुंबई उच्च न्यायलयातील अॅड. गुणवंत सदावर्ते यांची मुलगी आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी संप लवकरात लवकर मागे घ्यावा, सरकार कुठेही आठमुठेपणाची भूमिका घेत नाही. उच्च न्यायालयाचा जो काही अहवाल असेल त्यावर सरकार सकारात्मक निर्णय घेईल असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केलं आहे. कोणाच्यातरी सांगण्यावरुन, भडकवण्यावरुन एसटी कर्मचाऱ्यांनी स्वत:चे नुकसान करुन घेऊ नये असंही ते म्हणाले.