एक्स्प्लोर
एसटी कामगार संघटना पुन्हा संपाच्या तयारीत
प्रशासनाने जाहीर केलेल्या वेतनवाढीच्या सूत्रास संघटनेचा विरोध असल्यानं सदर वेतन करारावर संघटनेने स्वाक्षरी केलेली नाही. प्रशासनाने जाहीर केलेली वेतनवाढ लागू करतांना मागील वेतन कराराच्या तरतुदींमध्ये एकतर्फी बदल करून कायदेशीर तरतुदींचा भंग केला असल्याचं संघटनेनं पत्रकात नमूद केलंय.
धुळे : एसटी प्रशासनाने जाहीर केलेली पगार वाढ फसवी असून, संघटनेच्या मागणीवर सकारात्मक निर्णय न झाल्यास पुन्हा संपावर जाऊ, असा इशारा एसटी कामगार संघटनेने दिला आहे. संपाबाबत अंतिम निर्णय संघटनेच्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत होणार आहे. आषाढी एकादशीनंतर संप झाल्यास इंटक देखील पाठींबा देणार आहे.
प्रशासनाने जाहीर केलेल्या वेतनवाढीच्या सूत्रास संघटनेचा विरोध असल्यानं सदर वेतन करारावर संघटनेने स्वाक्षरी केलेली नाही. प्रशासनाने जाहीर केलेली वेतनवाढ लागू करतांना मागील वेतन कराराच्या तरतुदींमध्ये एकतर्फी बदल करून कायदेशीर तरतुदींचा भंग केला असल्याचं संघटनेनं पत्रकात नमूद केलंय.
प्रशासनाच्या सूत्रानुसार लागू केलेली वेतनवाढ प्रत्यक्षात कमी असल्यानं कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरल्यामुळे संघटनेस सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आपल्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संपाची तयारी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही, असं म्हणत एसटीची एकमेव मान्यताप्राप्त संघटना असलेल्या एसटी कामगार संघटनेनं पुन्हा एकदा संपाचा इशारा दिला आहे. मात्र हा संप कधी होणार यासंदर्भात संघटनेच्या येत्या आठवड्यात होत असलेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत अंतिम निर्णय जाहीर होणार असल्याचं संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी सांगितलं.
तर दुसरीकडे, ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटीचे बहुतांशी प्रवाशी हे सध्या पंढरपूर येथे मोठ्या संख्येनं जात असल्यानं या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून जर मान्यताप्राप्त संघटनेने आषाढी एकादशीच्या कालावधीत संप केला तर त्यात इंटकचा पाठींबा नसेल मात्र आषाढी एकादशीच्या कालावधीनंतर संप केल्यास त्यास इंटकचा देखील पाठींबा असेल, असं इंटकचे अध्यक्ष जयप्रकाश छाजेड यांनी सांगितलं.
इंटकची ही भूमिका पाहून मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे यांनी येत्या तीन आठवड्यात तरी संघटना संप जाहीर करणार नसल्याचं सांगितलं. एसटी प्रशासनाने या सर्व घडामोडी गांभीर्याने घेतल्या असून प्रशासन यासर्व गोष्टीवर लक्ष ठेवून आहे. तर दुसरीकडे आतापर्यंत झालेल्या संपात कर्मचाऱ्यांचेच नुकसान झाल्यानं कर्मचारी सद्य स्थितीत संप करण्याच्या मानसिकतेत नसल्याचा सूर आहे .
एसटी कामगार संघटनेने पत्रकात काय म्हटलंय?
“एसटी कर्मचाऱ्यांना केलेली ३२ ते ४८ टक्के पगारवाढ संदर्भातील प्रशासनाने केलेली बॅनरबाजी ही फसवी असून प्रत्यक्ष जाहीर केल्यापेक्षा कामगारांना वेतनातील वाढ कमी मिळत असल्याने कामगारांचा भ्रम निरास झालेला आहे. एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी ९ जून २०१८ रोजी घेतलेल्या बैठकीत मान्यताप्राप्त असलेली संघटना एसटी कामगार संघटनेने रुपये ४८४९ कोटी मध्येच वेतन वाढीचे सूत्र बसवून प्रशासनाकडे सुधारित प्रस्ताव सादर करावा, तसेच सदर कामबंद आंदोलनात सहभागी असलेल्या कर्मचाऱ्यांवर गंभीर गुन्हे वगळून कोणतीही कारवाई केली जाणार नाही असा निर्णय प्रसार माध्यमांसमोर जाहीर केलेला होता. त्यानुसार संघटनेने रुपये ४८४९ कोटी मध्येच वेतनवाढीचा सुधारित प्रस्ताव १५ जून २०१८ या दिवशी एसटी प्रशासनाला सादर केला . बैठकीत मान्य करून देखील आजतागायत कर्मचारी/पदाधिकाऱ्यांवरील कारवाया प्रशासनाने मागे घेतलेल्या नाहीत. उलट गैरहजर कर्मचाऱ्यांच्या वेतनातून एका दिवसाला आठ दिवसांचे वेतन कपात करण्याच्या सूचना परिपत्रकांन्वये जारी केल्यात.” असे संघटनेने पत्रकात म्हटले आहे.
तसेच, प्रशासनाने संघटनेने सादर केलेल्या प्रस्तावावर चर्चा करून उभयपक्षी मान्य तोडगा काढण्याऐवजी पूर्वीच्याच सूत्रानुसार कामगारांना वेतनवाढ माहे जून देय जुलै २०१८ च्या वेतनापासून लागू करण्याच्या परिपत्रकीय सूचना प्रसारित करून एसटी महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी प्रसार माध्यमांसमोर जाहीर केलेल्या निर्णयाविरुद्ध प्रशासनाने कार्य करून कामगारांची फसवणूक केलेली आहे. प्रशासनाने जाहीर केलेल्या वेतनवाढीच्या सूत्रास संघटनेचा विरोध असल्यानं सदर वेतन करारावर संघटनेने स्वाक्षरी केलेली नाही प्रशासनाने जाहीर केलेली वेतनवाढ लागू करतांना मागील वेतन कराराच्या तरतुदींमध्ये एकतर्फी बदल करून कायदेशीर तरतुदींचा भंग केला असल्याचं संघटनेनं पत्रकात नमूद केलंय.
प्रशासनाच्या सूत्रानुसार, लागू केलेली वेतनवाढ प्रत्यक्षात कमी असल्यानं कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरल्यामुळे संघटनेस सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब करून आपल्या मागण्यांच्या पुर्ततेसाठी संपाची तयारी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. महामंडळाचे अध्यक्ष तथा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी कामगारांच्या वेतनवाढीसंदर्भात निर्माण झालेली कोंडी दूर करण्याच्या दृष्टीने आपल्या पातळीवर बैठक घेऊन सन्मानजनक तोडगा काढावा, सन्मानजनक तोडगा न निघाल्यास संघर्ष अटळ असल्याचं एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे , जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केलंय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
राजकारण
करमणूक
बॉलीवूड
Advertisement