एक्स्प्लोर
उद्धव ठाकरेंची मध्यस्थी, एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची शक्यता
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. चार दिवसांपासून महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आगारात थांबून आहेत. परिणामी दिवाळीच्या दिवसांत प्रवाशांचा खोळंबा होत आहे.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपात मध्यस्थी केली आहे. त्यामुळे राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांचा संप आज मिटण्याची शक्यता आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज सलग चौथा दिवस आहे. चार दिवसांपासून महाराष्ट्राची लालपरी अर्थात एसटी बस आगारात थांबून आहेत. परिणामी दिवाळीच्या दिवसांत प्रवाशांचा खोळंबा होत आहे. अखेर उद्धव ठाकरेंनी गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याशी फोनवरुन चर्चा केली. त्यामुळे एसटी कर्मचारी आज संप मागे घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय संप मिटल्यानंतर एसटी संघटनांचे कर्मचारी तसंच नेते मुख्यमंत्र्यांच्या 'वर्षा' आणि उद्धव ठाकरेंच्या 'मातोश्री'वर जाऊन भेट घेणार आहे. यापूर्वी उद्धव ठाकरेंनी सरकारविरोधातील आंदोलनात सहभाग घेतला आहे. मग ते शेतकऱ्यांचं आंदोलन असो, महागाईविरोधातील आंदोलन असो किंवा नुकतंच झालेलं अंगणवाडी सेविकांचं आंदोलन, उद्धव ठाकरे यांनी सरकारविरोधात तातडीने प्रतिक्रिया दिल्या होत्या. मात्र गेल्या तीन दिवसांपासून एसटी कर्मचारी संपावर असताना, दिवाळ सणात प्रवाशांचे प्रचंड हाल होत असताना, उद्धव ठाकरेंनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नव्हती. त्यामुळे उद्धव संपाबाबत कधी बोलणार याची प्रतीक्षा होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या प्रमुख 3 मागण्या :
- एसटी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा
- पदनिहाय वेतनश्रेणी द्यावी
- जोपर्यंत कामगार, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबत सुधारित करार होत नाही तो पर्यंत कर्मचारी, कामगारांना 25 टक्के हंगामी वाढ देण्यात यावी
आणखी वाचा























