![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा
बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे. तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल.
![SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा SSC and HSC Exam date announced by Education minister varsha gaikwad SSC-HSC Exam Date: दहावी, बारावी परीक्षेची तारीख ठरली! शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणा](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/05/27225552/msbsh-sessc-class10-result.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : कोरोना संकटात गेल्या मार्च महिन्यापासून शाळा बंद होत्या. त्यामुळे शिक्षण व्यवस्थेवर मोठा परिणाम झाला आहे. मात्र दहावी-बारावीची परीक्षा कशी होणार, कधी होणार हा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांना पडला होता. दहावी-बारावी परीक्षेबाबतची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आज दिली आहे. बारावीची लेखी परीक्षा येत्या 23 एप्रिल पासून सुरु होणार आहे तर दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 31 मे दरम्यान घेतली जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
परीक्षा पार पडल्यानंतर बारावीचा निकाल जुलै महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल. तर दहावीचा निकाल ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाईल, अशी माहिती वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीची प्रॅक्टिकल परीक्षा 1 एप्रिल ते 22 एप्रिल दरम्यान घेतली जाणार आहे. तर दहावीची प्रॅक्टिकल परीक्षा 9 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान पार पडणार आहे.
कोरोनामुळे दहावी-बारावी परीक्षेचं वेळापत्रक कोलमडलं आहे. दरवर्षी फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरु होणाऱ्या परीक्षा उशीराने होत आहे. सध्या मुंबई, ठाणे वगळून राज्यातील बहुतेक ठिकाणी नववी ते बारावीचे वर्ग सुरू झाले आहेत. शिवाय लॉकडाऊन काळातही ऑनलईन वर्ग सुरु होते. राज्यात नववी ते बारावीच्या शाळांमध्ये दिवसेंदिवस विद्यार्थ्यांची उपस्थिती वाढत आहे. 18 जानेवारी रोजी 21,66,056 विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत, तर 21287 शाळा सुरू आहेत. सुमारे 76.8 टक्के विद्यार्थी शाळांमध्ये येत आहेत. हे उत्साहवर्धक चित्र आहे.
कोविड 19 च्या संदर्भात केंद्र व राज्य शासन तसेच आरोग्य विभागाने वेळोवेळी निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोर पालन करण्याच्या अधीन राहून परीक्षा आयोजित करण्यास मान्यता देण्यात येत आहे, असं वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
कोरोनाच्या काळात अनेक शालेय विद्यार्थी शाळाबाह्य झाले आहेत अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे व त्यासाठी विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे, वर्षा गायकवाड यांनी जाहीर केले. विद्यार्थी व पालकांनी या संदर्भात काही तक्रारी असतील तर स्थानीक शिक्षण अधिकारी वर्गाकडे संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)