अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात राज ठाकरेंसाठी खास दुआ
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. राज्यभरातून त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेतच मात्र आता त्यांच्यासाठी अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यामध्ये देखील खास दुआ मागण्यात आली आहे.
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हाताला दुखापत झाली आहे. त्यांचे हाताला प्लास्टर असल्याचे फोटो देखील समोर आले होते. यानंतर राज ठाकरे यांची चिंता करणारे आणि त्यांच्यासाठी प्रार्थना करणारे लोक समोर येत आहेत. विशेष म्हणजे राज्यभरातून त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्त्यांकडून त्यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेतच मात्र आता त्यांच्यासाठी अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यामध्ये देखील खास दुआ मागण्यात आली आहे.
अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्याचे केअर टेकर सय्यद फरहद यांनी या संदर्भात एक व्हिडीओ संदेश दिला आहे. या संदेशात ते म्हणतात की, मला आज सकाळी रियाज अहमद यांचा मुंबईहून फोन आला. त्यांनी मला तुमच्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं. मी आता अजमेर शरीफच्या हजरत ख्वाजा गरीब नवाज दर्ग्यात आहे. मी दुआ करत आहेत. मालिक तुम्हाला लवकर बरं करो. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी लता दिदींशी बोलणं झालं. त्यावेळी तुमचा उल्लेख झाला. आणि आज तुम्ही आजारी असल्याचं कळलं, असं त्यांनी म्हटलं आहे.
व्हिडीओमध्ये सय्यद फरहद पुढं म्हणतात की, मी आधीही कृष्णकुंजवर आलो होतो. एका महिन्यात मी आणखी तिथं येऊन तुम्हाला भेटेल. तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला उत्तम आरोग्य लाभो, दीर्घायुष्य लाभो, असं त्यांनी म्हटलं आहे. तुमचं जे महाराष्ट्रासाठी जे व्हिजन आहे. तुमचं जे मिशन आहे त्याला यश मिळो, असंही त्यांनी म्हटलं आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, असं सय्यद फरहद यांनी म्हटलं आहे.
माहितीनुसार, राज ठाकरे यांना टेनिस खेळत असताना ही दुखापत झाली. त्यांच्या डाव्या हाताला ही दुखापत झाली आहे. ही दुखापत फार मोठी नसली तर हातावर सूज आल्याने त्यांना वेदना होत असल्याची माहिती आहे. डॉक्टरांनी त्यांच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाल्याचं सांगितलं असून काही दिवस विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.