वडिलांवर गोळ्या झाडल्या, मुलाला तीन दिवसांची पोलिस कोठडी, बीडच्या आष्टीतील घटना
बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये काल जन्मदात्या पित्यावर मुलाने गोळ्या झाडल्याच्या घटनेनंतर कालच त्या मुलाला आष्टी पोलिसांनी अटक केली असून त्यास आज आष्टी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
बीड: बीड जिल्ह्यातील आष्टीमध्ये काल जन्मदात्या पित्यावर मुलाने गोळ्या झाडल्याच्या घटनेनंतर कालच त्या मुलाला आष्टी पोलिसांनी अटक केली असून त्यास आज आष्टी न्यायालयात हजर केले असता तीन दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. सदरील घटनेची फिर्याद मुलाची आई शोभा लटपटे यांनी आष्टी पोलीस स्टेशन मध्ये दिली आहे.
जन्मदात्या बापावर मुलाने झाडल्या तीन गोळ्या
आष्टी शहरातील विनायक नगर भागांमध्ये जन्मदात्या बापावर पोटच्या मुलाने बंदूकीतून तीन गोळ्या झाडून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना काल सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
संतोष किसन लटपटे (50) असे जखमी इसमाचे नाव असून त्यांच्यावर पोटचा मुलगा असलेल्या किरण संतोष लटपटे (24) याने घरगुती वादातून तीन गोळ्या झाडल्या. यातील दोन गोळ्या संतोष लटपटे यांच्या पोटावर झाडण्यात आल्या. जखमीस गंभीर उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. संतोष लटपटे यांना दारूचे व्यसन होते यातून घरात सातत्याने छोटे-मोठे वाद होत असत. त्यातून हा प्रकार घडला असल्याचे पोलिसांनी सांगितले असून आरोपीची सध्या कसून चौकशी सुरू आहे.
तीन महिन्यापूर्वी सैन्यदलातून झाले होते सेवानिवृत्त
दरम्यान संतोष लटपटे हे तीन महिन्यापूर्वी भारतीय सैन्य दलातील निवृत्त झाल्याची माहिती आहे. त्यांच्याकडे बंदुकीचा परवाना होता. गुरुवारी सायंकाळी याच बंदूकीतून पोटच्या मुलाने तीन गोळ्या झाडल्या. त्यातील दोन गोळ्या त्यांच्या पोटात गेल्या तरी एक गोळी हुकली असल्याची माहिती पोलिसांनी दिली. किरण लटपटे यांनी आपल्या पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की वडील संतोष लटपटे दारू पिऊन आईला मारहाण सुरू केली होती. त्यानंतर मला राग अनावर झाल्याने आपल्या बंदुकीतून गोळ्या झाडल्याचे त्याने पोलिसांना सांगितले आहे.