एक्स्प्लोर
सोमवती यात्रेनिमित्त 'जय मल्हार'चा गजर, सोन्याची जेजुरी दुमदुमली

इंदापूर : महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या खंडेरायाच्या सोमवती यात्रेला आजपासून सुरुवात झाली आहे. या यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून दोन लाखांपेक्षा अधिक भाविक जेजुरीमध्ये दाखल झाले आहेत.
वर्षभरात जेजुरीमध्ये विविध यात्रांचं आयोजन होतं असतं. मात्र सोमवती अमावस्येच्या यात्रेला विशेष महत्त्व आहे. सोमवती यात्रेनिमित्त खंडेरायाची गडावरुन पालखी निघते. संध्याकाळपर्यंत ही पालखी कऱ्हा नदीच्या काठावर आणली जाते.
नदी तीरावर पालखी रंभाई मंदिराशेजारी विसावते. त्यानंतर लाखो भाविकांच्या साक्षीने भंडारा उधळत देवाला कऱ्हा नदीत स्नान घालण्यात येतं. स्नानानंतर पालखी पुन्हा गडाकडे रवाना होते.
खंडेरायाच्या गडावर दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत. उन्हाची तीव्रता प्रचंड असली तरी भाविकांवर याचा काहीच परिणाम होताना दिसत नाही. लाखो भाविक रांगेत उभं राहून खंडेरायाचं दर्शन घेत आहेत.
सोमवती यात्रेनिमित्त 'येळकोट येळकोट जय मल्हार'च्या जयघोषानं जेजुरी दणाणून निघाली आहे. तसंच भंडाऱ्याची उधळण होत असल्यामुळे भक्तांना सोनेरी जेजुरीचं रुप पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा























